| पनवेल | ग्रामीण प्रतिनिधी |
पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहर व ग्रामीण भागात वीज खंडित होण्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस नगरसेवक प्रकाश म्हात्रे यांनी एमएसईडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र देत पावसाळापूर्वी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्याची मागणी केली आहे.
पनवेल तालुक्यातील विविध भागांमध्ये पावसाळ्यात झाडांच्या फांद्या, विद्युत खांबांची पाहणी, डीपीची तपासणी इत्यादी कामे केली जातात. मात्र, याबाबतची माहिती नागरिकांना मिळत नसल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांना उत्तर देताना अडचणी निर्माण होत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत संपर्कासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक, वीज पुरवठा खंडित झाल्यास तक्रार नोंदविण्याची व्यवस्था आणि विभागाने केलेल्या उपाययोजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक आयोजित करावी, जेणेकरून लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक यांच्यात समन्वय वाढून नागरिकांना चांगली सेवा मिळेल, अशी अपेक्षा नगरसेवक म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.







