शिंदे गटातील सुराराम माळींचा पराभव
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रेवदंडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक मंगळवारी (दि.2) झाली. या निवडणुकीत शेकाप, महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष सदाशिव मोरे हे बहुमतांनी विजयी झाले. शिंदे गटातील उमेदवार सुराराम माळींचा यांचा दारून पराभव झाला. उपसरपंचपदी संतोष मोरे यांची निवड झाल्याबद्दल शेकापसह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्याकडून संतोष मोरे यांचे अभिनंदन करण्यात आले.
रेवदंडा ग्रामपंचायतीमधील उपसरपंचपद गेली अनेक महिने रिक्त होते. या पदाची निवडणूक मंगळवारी घेण्यात आली. शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष मोरे उर्फ बाबू यांनी या पदासाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर शिंदे गटातील सुराराम माळी यांनी देखील अर्ज दाखल केला होता. एकाच पदासाठी दोन अर्ज दाखल झाल्याने या पदाची निवडणूक घेण्यात आली. गुप्त मतदानाद्वारे निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये संतोष मोरे यांना नऊ आणि माळी यांना फक्त सात मते मिळाली. त्यामुळे संतोष मोरे यांची उपसरपंच म्हणून निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष मोरे यांची उपसरपंच म्हणून निवड झाल्यावर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश खोत, शरद वरसोलकर, दादा मोरे, निलेश खोत, रेवदंड्याच्या माजी सरपंच सोनाली मोरे, निलेश गाडे, जनार्दन कोंडे, अशिष गोंधळी, ॲड. परेश देशमुख, मिलींद चुनेकर, प्रमोद नवखारकर, विजय चौलकर, संदीप खोत, अरुण भगत, अंजू मोरे, अशोक नाईक, बाळु नवखारकर, प्रकाश भिसे, शुभम आंबुकर, रघुनाथ कोंडे, तसेच सदस्य मनीषा चुनेकर, खलील तांडेल, शुभांगी कोंडे, स्नेहल बळी, प्रिती गोंधळी, सुदेश भोपू आदी शेकाप, व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून संतोष मोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. अतिक्रमण केल्याप्रकरणी शिंदे गटातील मंदा बळी यांचे सदस्यत्व पद रद्द करण्यात आले होते. याबाबत ॲड. परेश देशमुख यांनी युक्तीवाद करीत न्यायालयासमोर पुरावे सादर केले. त्यामुळे बळी यांचे पद रद्द करण्यात आले. त्यामुळे उपसरपंच पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त होते. अखेर या पदाची निवडणूक मंगळवारी झाली. या निवडीनंतर संतोष मोरे यांनी ॲड. परेश देशमुख यांचे आभार व्यक्त केले.
सुप्रिया पाटील यांच्याकडून अभिनंदन
अलिबाग अर्बन बँकेच्या चेअरमन सुप्रिया पाटील, अलिबाग सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षा शैला पाटील तसेच रायगड बाजारचे उपाध्यक्ष प्रमोद घासे यांनी रेवदंडा येथे जाऊन नवनिर्वाचित उपसरपंच संतोष मोरे यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी संतोष मोरे यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत रेवदंडा ग्रामपंचायतीच्या विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.







