अलिबाग वन विभागांतर्गत 40 वनपाल, वनरक्षकांच्या बदल्या
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग वन विभागांतर्गत कार्यरत असलेल्या वनपाल आणि वनरक्षकांच्या बदल्या समुपदेशनाच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटना, अलिबाग शाखेचे अध्यक्ष मौलेश तायडे यांनी दिली. या प्रक्रियेबाबत कर्मचारीवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
अलिबाग वन विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या सुमारे 40 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये वनपाल आणि वनरक्षकांचा समावेश आहे. राज्य शासनाने कर्मचारी बदल्या अधिक न्याय्य, पारदर्शक आणि कर्मचारी हित लक्षात घेऊन व्हाव्यात, या उद्देशाने समुपदेशनाधारित बदली प्रक्रियेला प्राधान्य दिले आहे. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी अलिबागचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी केल्याचे सांगण्यात आले.
बदली प्रक्रियेदरम्यान प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतंत्रपणे बोलावून त्यांची मते जाणून घेण्यात आली. कौटुंबिक परिस्थिती, आरोग्यविषयक बाबी, मुलांचे शिक्षण, महिला कर्मचाऱ्यांच्या गरजा तसेच प्रवासाचे अंतर आदी बाबींचा विचार करून बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे कर्मचारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला असून, विशेषतः महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या प्रक्रियेबाबत समाधान व्यक्त केले आहे.
अलिबाग वन विभागात सलग तिसऱ्या वर्षी राबविण्यात आलेल्या समुपदेशनाधारित आणि पारदर्शक बदली प्रक्रियेचे स्वागत होत असून, कर्मचारी हिताला प्राधान्य देण्यात आल्याची भावना कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे.
बदली ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून ती कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक आयुष्याशी निगडित असते. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या अडचणी, गरजा आणि परिस्थितीचा विचार करून बदली प्रक्रिया राबविण्यात आली. गंभीर कौटुंबिक अडचणी, आरोग्यविषयक समस्या, मुलांचे शिक्षण आणि अन्य सामाजिक कारणांनाही योग्य प्राधान्य देण्यात आले. यामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कर्मचारीहिताची ठरली.
राहुल पाटील,
उपवनसंरक्षक, अलिबाग
मौलेश तायडे,
शासनाच्या समुपदेशनाधारित बदली धोरणाची अलिबाग वन विभागाने प्रभावी अंमलबजावणी केली आहे. कर्मचाऱ्यांच्या पसंती, अडचणी आणि वैयक्तिक परिस्थितीचा विचार करून बदल्या झाल्याने कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. कर्मचारी हित जपणारा हा अलिबाग पॅटर्न राज्यासाठी आदर्श ठरू शकतो.
अध्यक्ष, महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटना,
अलिबाग शाखा






