| पाली /बेणसे | प्रतिनिधी |
संविधान अमृत महोत्सवाचे औचित्य साधून तेजस सेवा प्रतिष्ठान, संगमनेर या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्ररत्न पुरस्कार सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असणारे शिक्षक संजय दौलत निकम यांचा महाराष्ट्ररत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
उत्तम गायक, सुलेखनकार, साहित्याची आवड असणारे आणि संविधान विषयक जनजागृतीमध्ये नेहमी अग्रेसर राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या चौफेर कामगिरीची दखल घेऊन त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ विधिज्ञ संघराज रुपवते, ज्येष्ठ व्याख्याते प्रा. मुकुंद भारसाकळे, आमदार डॉ. किरण लहामटे, माजी पदवीधर आमदार सुधीर तांबे आणि आयोजक रवींद्र घोसाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी संजय निकम यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मुलगा स्वराज निकम यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राज्यभरातून अनेक संविधानप्रेमी या सोहळ्याला उपस्थित होते. याप्रसंगी संविधानाचा प्रचार आणि प्रसार करणारे प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक मुकुंद भारसाखळे यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान पार पडले. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील प्रतिनिधींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. प्रत्येक जिल्ह्यातील एका गुणवंत व्यक्तीच्या कार्याचा आढावा घेऊन, त्यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून हा महाराष्ट्ररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.







