| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
पनवेल शहरात सोमवारी दुपारी झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने उन्नती पुलावरील दुरुस्ती कामांचा फज्जा उढवला आहे. अवघ्या काही मिनिटांच्या पावसात पुलाच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर पाणी झिरपत खाली कोसळू लागल्याने पुलावर अक्षरशः धबधबे सुरू झाल्याचा अनुभव वाहनचालकांना आला. विशेष म्हणजे मागील वर्षी पुलावरील गळती थांबविण्यासाठी लाखो रुपये खर्च करून दुरुस्तीची कामे करण्यात आली होती. मात्र, यंदाच्या पहिल्याच पावसात पुन्हा तीच समस्या समोर आल्याने या कामांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. लाखो रुपयांचा खर्च करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, पुलावरून अचानक कोसळणाऱ्या पाण्यामुळे दुचाकीस्वार आणि चारचाकी चालकांची मोठी गैरसोय झाली. वाहन चालविताना समोरून पडणाऱ्या पाण्यामुळे दृश्यमानता कमी होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नसली तरी भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.







