उड्डाण पुलावरून धावणाऱ्या बसेसमुळे विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय; कारवाईचे आश्वासन
| नागोठणे | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे व मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागोठण्यात सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या कोकण मार्गावरील काही एसटी बसेस थांबा न घेता थेट उड्डाण पुलावरून जात असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. मुंबई, पनवेल येथून येणारे प्रवासी तसेच नागोठणे येथील कोकण एज्युकेशन सोसायटी व भारतीय एज्युकेशन सोसायटीमध्ये उच्च शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी आणि नागोठण्यावरून कोलाड, माणगावकडे जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसत आहे.
नागोठणे हायवेनाका येथील उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर मुंबई व कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सर्व्हिस रोडचा वापर करणे अपेक्षित आहे. मात्र, राज्य परिवहन महामंडळाच्या माणगाव, महाड, श्रीवर्धन, पोलादपूर तसेच कोकणातील काही आगारांच्या काही एसटी बसेस सर्व्हिस रोडवरून न जाता थेट उड्डाण पुलावरून जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. यामुळे महाडच्या दिशेने जाणाऱ्या काही बसेस नागोठण्यातील प्रवाशांना आयटीआय कॉलेजजवळ तर मुंबईकडे जाणाऱ्या बसेस आंगर आळी येथे उतरवत असल्याने प्रवाशांना पायी चालत किंवा रिक्षाने नागोठण्यात यावे लागत आहे. परिणामी अतिरिक्त खर्च व वेळेचा त्रास सहन करावा लागत आहे.
नागोठणे हे जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असतानाही एसटी बसेस येथे थांबत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. काही चालकांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
याबाबत राज्य परिवहन महामंडळाचे रायगड जिल्हा वाहतूक नियंत्रक सुहास चौरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “नागोठणे येथील सर्व्हिस रोडवरून न जाता उड्डाण पुलावरून एसटी नेणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात येईल. तसेच काही दिवस नागोठणे हायवेनाका येथे महामार्गावर एसटीचे भरारी पथक तैनात करून लक्ष ठेवण्यात येईल.”







