| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
पावसाळ्याची चाहूल लागताच पनवेल तालुक्यातील बाजारपेठांमध्ये विविध रानभाज्यांचे आगमन सुरू झाले आहे. शेवळ, पेठारी, भोकर, करांदे, हुलगुंड, कोळी यांसारख्या पारंपरिक रानभाज्या विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्या असून, त्यांना नागरिकांकडून चांगली मागणी आहे.
मात्र, यंदा कधी ऊन तर कधी मुसळधार पाऊस अशा बदलत्या हवामानाचा परिणाम रानभाज्यांच्या उपलब्धतेवर झाला आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी असून, दर ही गेल्या वर्षांच्या तुलनेत वाढले आहेत. महागाईमुळे अनेक ग्राहकांना इच्छेनुसार रानभाज्यांची खरेदी करता येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
रानभाज्या आरोग्यासाठी पोषक आणि औषधी गुणधर्मांनी युक्त असल्याने पावसाळ्यात त्यांची विशेष मागणी असते. अनेक नागरिक बाजारात रानभाज्या पाहण्यासाठी येत असले तरी वाढलेल्या किमतीमुळे कमी प्रमाणात खरेदी करत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास रानभाज्यांची आवक वाढून दर काहीसे कमी होतील, अशी अपेक्षा ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे.







