चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
| रसायनी | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या मासिक सर्वसाधारण सभेत थकीत कर्जदारांकडून नियमानुसार कर्जवसुली करण्याची मागणी मांडणाऱ्या संचालक तथा वासांबे-मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी वैभव बाळकृष्ण पाटील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, 28 जून रोजी पतसंस्थेच्या मासिक सर्वसाधारण सभेदरम्यान एका थकीत कर्जदाराच्या थकबाकीचा विषय चर्चेला आला होता. यावेळी संस्थेच्या मंजूर उपविधी आणि सहकार कायद्यानुसार थकीत कर्जाची वसुली करणे बंधनकारक असल्याची भूमिका संचालक वैभव पाटील यांनी मांडली.
सभेनंतर काही व्यक्तींनी सभास्थळाबाहेर त्यांचा मार्ग अडवत शिवीगाळ केली, दमदाटी केली, तसेच मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
या घटनेबाबत वैभव पाटील म्हणाले, पतसंस्थेचा निधी सुरक्षित राहणे, थकीत कर्जाची कायदेशीर वसुली होणे आणि सभासदांच्या हिताचे संरक्षण करणे, हीच आमची भूमिका आहे. कायद्याच्या चौकटीत काम करणाऱ्यांवर दबाव आणण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी. दरम्यान, या घटनेमुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून, सहकारी संस्थांमधील आर्थिक शिस्त, थकीत कर्जवसुली, पारदर्शक कारभार आणि पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.







