भर पावसातही नागरिकांचा निर्धार कायम; शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी
| चिरनेर | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना सुरू असलेली टोल वसुली आणि महामार्गाच्या अनेक ठिकाणची निकृष्ट व धोकादायक रस्त्याची गुणवत्ता या गंभीर प्रश्नांकडे शासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी आज खारपाडा टोलनाक्यावर भर पावसात शांततापूर्ण लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
मुसळधार पाऊस सुरू असतानाही नागरिकांनी मोठ्या निर्धाराने या आंदोलनात सहभाग घेतला. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून, समस्त कोकणातील जागरूक नागरिकांचे आंदोलन आहे. सुरक्षित, दर्जेदार आणि पूर्णत्वास गेलेला महामार्ग मिळावा, तसेच तोपर्यंत टोल वसुली थांबवावी, ही या आंदोलनामागील प्रमुख मागणी आहे.
आंदोलनातून कोकणातील सर्व पक्षीय विद्यमान व माजी खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधींना नम्र विनंती करण्यात आली आहे की, महामार्गावरील टोल वसुलीचा प्रश्न आणि रस्त्याच्या गुणवत्तेचा प्रश्न सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात ठामपणे मांडावा. हा विषय केवळ उपस्थित करून न थांबता, शासनाकडून ठोस निर्णय होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा करावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. हा महामार्ग कोकणवासीयांच्या दैनंदिन जीवनाशी, अर्थकारणाशी आणि सुरक्षित प्रवासाशी निगडित अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे हा प्रश्न पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन जनहिताचा विषय म्हणून हाताळण्याची गरज आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
रस्ता पूर्ण आणि दर्जेदार होईपर्यंत टोल वसूली अन्यायकारक आहे, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. या प्रश्नावर शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी आणि लोकप्रतिनिधींनी जनतेचा आवाज विधिमंडळात बुलंद करावा, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. या आंदोलनात ज्येष्ठ साहित्यिक एल. बी. पाटील, नरेश पाटील, नंदकुमार जांभूळकर, निरंकार पाटील, कमलेश ठाकूर, अजय भोईर, वैभवी म्हात्रे, अरुण ओतकर, रस्ते अभ्यासक चैतन्य पाटील, तसेच अनेक सुजाण नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला तसेच कोकणासह राज्याच्या विविध भागांतील अनेक नागरिकांनी, पत्रकार यांनी सोशल मीडिया व अन्य माध्यमांद्वारे ऑनलाइन सहभाग नोंदवत या आंदोलनाशी एकात्मता व्यक्त केली. या लक्षवेधी आंदोलनासाठी पनवेल तालुका पोलीस ठाण्याने घालून दिलेल्या अटी, नियम व सूचनांचे काटेकोर पालन करण्यात आले. हे लक्षवेधी आंदोलन शांततापूर्ण व सुव्यवस्थित पद्धतीने पार पडले. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या लक्षवेधी आंदोलनाच्या माध्यमातून जागरूक नागरिकांनी आपले कर्तव्य पार पाडले आहे. आता लोकशाही व्यवस्थेतील लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी ओळखून महामार्गावरील टोल वसुली आणि रस्त्याच्या गुणवत्तेचा प्रश्न सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात ठामपणे मांडावा आणि तो प्रश्नमार्गी लागेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पाठपुरावा
भर पावसात सुरू झालेले हे लक्षवेधी आंदोलन म्हणजे केवळ निषेध नसून, कोकणातील लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि न्याय्य हक्कांसाठी दिलेली शांततापूर्ण पण ठाम हाक असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचेपर्यंत हा पाठपुरावा सुरूच राहील, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.







