| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर तालुक्यातील देवळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील नाणेघोळ गावात डोंगराच्या उतारावरील सुमारे अर्धा किलोमीटर परिसरात जमिनीला अर्धा ते एक फूट रुंदीच्या मोठ्या भेगा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पाहणीत दरीसदृश भू-भागात अर्धवर्तुळाकार स्वरूपात मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचे आढळून आले.
संभाव्य भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख कपिल घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाणेघोळ येथील ग्रामस्थांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. स्थलांतरित नागरिकांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्याचाही निर्णय प्रशासनाने घेतला असून, ग्रामस्थांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात नैसर्गिक आपत्तीचा धोका वाढला आहे. नाणेघोळ गावाचा काही वर्षांपूर्वी झालेल्या भूस्खलन आणि अतिवृष्टीच्या घटनांनंतर संभाव्य आपत्तीग्रस्त गावांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या परिसरावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. घटनास्थळी नायब तहसीलदार सानप, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता कांबळे, विस्तार अधिकारी हंबीर, ग्रामपंचायत अधिकारी त्रिशिला गंभीरे, तलाठी जाधव, पुरवठा अधिकारी आबा जगताप, मंडळ अधिकारी मंगेश पवार तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यापूर्वी झालेल्या नैसर्गिक आपत्तीत नाणेघोळ गावातील पाच घरांचे नुकसान झाले होते. त्यामुळे यावेळी नाणेघोळ गावाला नैसर्गिक आपत्तीग्रस्त घोषित करून ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी घरकुले व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार कपिल घोरपडे यांनी दिली.







