कोपर दुतर्फा योजनेतील कथित निकृष्ट कामावरून संताप; ठेकेदारांसह अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशीची मागणी
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील कोपर दुतर्फा खारबंदिस्ती योजनेसाठी शासनाने खर्च केलेले तब्बल 6 कोटी 25 लाख रुपये पहिल्याच पुराच्या पाण्यात वाहून गेले का? असा संतप्त सवाल आता स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या खारबंदिस्तीने पहिल्याच पावसात दम तोडल्याचा आरोप होत असून, कामात मोठ्या प्रमाणात कथित निकृष्ट दर्जा आणि अंदाजपत्रकापासून तडजोड केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ठेकेदारांसह कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
कोपर दुतर्फा खारभूमी (खारबंदिस्ती) योजनेचे काम श्री स्वामी समर्थ, पुणे या ठेकेदाराला देण्यात आले होते. त्यानंतर हे काम सब-ठेकेदारांकडे सोपविण्यात आल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. यामध्ये संतोष बुरूडे, बबन, गुलाबचंद आणि नवनाथ यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. सुमारे चार किलोमीटर लांबीच्या या खारबंदिस्तीसाठी मंजूर अंदाजपत्रकानुसार 12 मीटर रुंदी, 4 मीटर उंची, 3 मीटर माथा, दुतर्फा पिचिंग, एक फूट मुरूमाचा थर आणि तीन उघाड्यांची तरतूद होती. मात्र, प्रत्यक्षात या सर्व निकषांना फाटा देत काम करण्यात आल्याचा आरोप आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, 39 फूट रुंदीचा असणे अपेक्षित असलेला बांध केवळ 18 ते 20 फूट रुंद करण्यात आला. 13 फूट उंचीऐवजी केवळ 7 ते 8 फूट उंची ठेवण्यात आली, तर 9.25 फूट माथ्याऐवजी अवघा 5 ते 6 फूट माथा करण्यात आला. एक फूट मुरूमाचा थर देणे अपेक्षित असताना, अनेक ठिकाणी तीन-चार इंचांचाही थर नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, चार किलोमीटर परिसरातील तीन उघाड्यांची मापेदेखील अंदाजपत्रकानुसार नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुराचे पाणी नैसर्गिक प्रवाहाने वाहून न जाता हमरापूर परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. नियोजनानुसार काम झाले असते, तर ही परिस्थिती उद्भवली नसती, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
या प्रकरणामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. काम अंदाजपत्रकानुसार झाले नसल्याचा आरोप असताना संबंधित ठेकेदारांची बिले कशी मंजूर झाली? प्रत्यक्ष मोजमाप आणि गुणवत्ता तपासणी झाली होती का? की केवळ कागदोपत्री पूर्तता दाखवून कोट्यवधी रुपयांचा निधी अदा करण्यात आला? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाला द्यावी लागणार आहेत. दरम्यान, खारभूमी अभिलेख विभागात नुकत्याच रुजू झालेल्या उपअभियंता नैना सुनकड यांनी कोपर दुतर्फा खारबंदिस्तीची पाहणी केली असून, संबंधित ठेकेदारांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती दिली. मात्र, स्थानिकांच्या मते, केवळ नोटिसा देऊन हा विषय संपणार नाही. शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपव्यय झाला असेल, तर संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून कठोर कारवाई करावी. तसेच कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. आता या संपूर्ण प्रकरणात शासनाने स्वतंत्र तांत्रिक समितीमार्फत चौकशी करून प्रत्यक्ष मोजमाप, गुणवत्ता तपासणी आणि आर्थिक व्यवहारांची छाननी करणार का, याकडे संपूर्ण पेण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
स्थानिकांकडून थेट सवाल…
अंदाजपत्रकाप्रमाणे काम झालेच नसेल, तर बिले मंजूर कोणी केली?
गुणवत्ता तपासणी आणि प्रत्यक्ष मोजमाप झाले होते का?
पहिल्याच पुरात बांधाची दुरवस्था कशी झाली?
निकृष्ट कामासाठी जबाबदारांवर गुन्हे दाखल होणार का?
शासन स्वतंत्र तांत्रिक चौकशी समिती नेमणार का?







