‘गगनयान’ मोहिमेवर परिणामाची भीती
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
चांद्रयान, मंगळयानसारख्या ऐतिहासिक मोहिमांनी जगभर भारताचा झेंडा फडकवणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) समोर आता अंतर्गत संकट उभे ठाकले आहे. गेल्या काही महिन्यांत 100 हून अधिक शास्त्रज्ञ आणि तांत्रिक तज्ज्ञांनी राजीनामे किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने इस्रोमध्ये ब्रेन ड्रेनची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, यातील अनेक शास्त्रज्ञ भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेशी संबंधित असल्याने केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करत राजीनाम्यांच्या मंजुरीचे अधिकार थेट अंतराळ विभागाकडे वर्ग केले आहेत.
देशाला अंतराळ क्षेत्रात नवी ओळख मिळवून देणाऱ्या इस्रोमध्ये अनुभवी शास्त्रज्ञांच्या वाढत्या निर्गमनामुळे चिंता व्यक्त होत आहे. उपलब्ध माहितीनुसार, आतापर्यंत 100 ते 120 शास्त्रज्ञांनी इस्रोला रामराम ठोकला आहे. यामध्ये युआर राव सॅटेलाइट सेंटरचे सुमारे 80, तर विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे किमान 20 शास्त्रज्ञ असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, या शास्त्रज्ञांपैकी अनेक जण भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेवर म्हणजेच गगनयान प्रकल्पावर कार्यरत होते. त्यामुळे या मोहिमेच्या वेळापत्रकावर आणि अंमलबजावणीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.







