आषाढी एकादशीनिमित्त शाळांमध्ये दुमदूमला विठ्ठलाचा जयघोष
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
आषाढी एकादशीनिमित्त रायगड जिल्ह्यामध्ये वारकरी संस्कृतीचे दर्शन घडले. जिल्हा परिषद शाळांसह वेगवेगळ्या खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांनी हातात टाळ, मृदूंग, लेझीम घेऊन पारंपारिक वेशभूषा करून हरिनामाचा जप करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखूमाईसह इतर संताची केलेली वेशभूषा दिंडीचे आकर्षण ठरले. संपुर्ण जिल्हा विठ्ठलाच्या जयघोषाने दुमदूमला. जिल्ह्यामध्ये मंगलमय वातावरणात हा सोहळा पार पडला. दरम्यान पर्यावरणाचे महत्व पटवून देत असता, ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेशही पोहचविण्याचा प्रयत्न या वारीच्या माध्यमातून करण्यात आला.
आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी आणि चातुर्मासाची सुरुवात म्हणून ओळखली जाते. वारकरी संप्रदायातील अत्यंत पवित्र दिवस म्हणून ओळखला जातो. आषाढ महिन्यातील शुल्क पक्षाच्या एकादशीला येणार आध्यात्मिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्वाचा दिवस म्हणून मानला जातो. यंदा आषाढी एकादशी शनिवारी (दि.25) रायगड जिल्ह्यामध्ये साजरी करण्यात आली. वेगवेगळे धार्मिक उपक्रमांतून हा उत्सव साजरा करण्यात आला. आषाढी एकादशीनिमित्त वेगवेगळ्या संस्था, संघटनांच्या वतीने दिंडीचे आयोजन करण्यात आले. आषाढी एकादशीचे महत्व पटवून देण्यात आले. जिल्ह्यातील विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्यात आले. यावेळी मंदिरात अलोट गर्दी दिसून आली. आषाढी एकादशीनिमित्त रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांसह खासगी शाळांमध्ये गावागावात व शाळेच्या परिसरात वारकरी दिंडी काढण्यात आली. काही शाळकरी मुलांनी विठ्ठल रखुमाई तर काहींनी वेगवेगळ्या संताची वेशभूषा करून हरिनामाचा जप करण्यात आला. टाळ, मृदूंगाच्या आवाजाने संपुर्ण जिल्हा भक्तीमय वातावरणात रमून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले. शाळकरी मुलांनी या सोहळ्याचा आनंद मनमुरादपणे लुटला. यावेळी पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली. झाडांचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.







