| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्ष कायमच विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे. विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी रविवारी (दि.26) मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्क येथे तिरंगा मार्च काढण्यात येणार आहे. या मोर्चात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विद्यार्थ्यांची ताकद बळकट करू या, असे आवाहन शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केले.
नीट पेपर फुटीप्रकरणी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील जंतर मंतर येथे आंदोलन सुरु केले. शिक्षणमंत्री महेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह पेपर फुटी प्रकरणाची चौकशी पारदर्शक व सखोल करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी हजारो तरुण, तरुणी या आंदोलनात सहभागी झाले. मात्र, सरकारने पोलीस बलाचा वापर करीत त्यांच्यावर लाठीहल्ला करण्यात आला. या अमानुष हल्ल्यात असंख्य तरुण जखमी झाले. तर काही तरुण मृत पावले. विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी रविवारी (दि.26) तिरंगा मार्चचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती न घेता, भारताचा तिरंगा हाती घेऊन दादर येथील शिवाजी पार्क येथे तिरंगा मार्च सकाळी दहा वाजल्यापासून काढण्यात येणार आहे. हा लढा न्यायासाठी असणार आहे. राष्ट्रीय ध्वज असणारा तिरंगा हाती घेऊन रायगड जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते व तरुणांनी तिरंगा मार्चमध्ये सामील व्हावे, असे आवाहन शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.







