| पनवेल | प्रतिनिधी |
गुन्हे शाखा कक्ष 3 ने करंजाडे परिसरात कारवाई करून विनापरवाना मद्यसाठा बाळगणाऱ्या एका महिलेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत सुमारे सहा हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. करंजाडे येथील सिद्धिविनायक बिल्डिंगसमोर, सेक्टर-7, पुष्पकनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कारवाईदरम्यान आरोपी महिलेच्या ताब्यातून विविध प्रकारच्या मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्यामध्ये 180 मिलीच्या देशी मद्याच्या 93 बाटल्या, 90 मिलीच्या देशी मद्याच्या 85 बाटल्या, रॉयल चॅलेंज क्लासिक प्रीमियम व्हिस्कीच्या 180 मिलीच्या तीन बाटल्या, मास्टर्स डिलाईट प्रीमियम व्हिस्कीच्या 180 मिलीच्या तीन बाटल्या तसेच मॅकडॉवेल्स क्रमांक 1 या ब्रँडच्या 90 मिलीच्या तीन बाटल्यांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या मद्यसाठ्याची एकूण किंमत सुमारे सहा हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.







