जीवघेण्या खड्ड्यांमुळे ग्रामस्थांचा संताप; प्रशासनाला चार दिवसांचा अल्टिमेटम
| चणेरा | प्रतिनिधी |
विनवली फाटा ते कोरखंडा फाटा या प्रमुख रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे ग्रामस्थांचा संताप आता उफाळून आला आहे. संबंधित प्रशासन याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. दरम्यान, चार दिवसांत रस्त्याची दुरुस्ती करा, अन्यथा बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरच खड्डे भरणे आंदोलन करू, असा थेट इशारा महागाव ग्रामसभेने दिला आहे.
महागाव येथे सोमवारी (दि.24) ग्रुप ग्रामपंचायत प्रशासक नेरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत विनवली फाटा ते कोरखंडा फाटा या रस्त्याच्या दुरवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला. हा मार्ग विनवली, महागाव, बहुलेवाडी, आदिवासीवाडी, बारपे, महुरे, कोरखंड, म्हसाडी आणि करिवणे यांसह अनेक गावांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते. परंतु, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी डांबरही उरलेले नाही. पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. या मार्गावर इंदापूर-कोरखंड एस.टी. बससेवा सुरू असून, खराब रस्त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मालवाहतूक, टेम्पो आणि इतर वाहनांचे भाडे वाढल्याने नागरिकांवर आर्थिक भार पडत आहे. गर्भवती महिलेला रुग्णालयात नेताना याच खड्डेमय रस्त्यावर प्रसूती होण्याची वेळ यावी का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. तसेच, अपघात होऊन एखादा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवालही करण्यात आला. तसेच, गणपती उत्सव काही दिवसांवर आला असताना या मार्गावर नागरिकांची वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली.
दरम्यान, महागाव ग्रामसभेत सर्वपक्षीय पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी एकमुखी ठराव करून बांधकाम विभागाला चार दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीत खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त न झाल्यास कार्यालयासमोरच आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेकडे आता राजकीय नेते आणि प्रशासन लक्ष देणार का, की आंदोलनानंतरच जागे होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







