आठ हजार 870 दहीहंड्या फुटणार; लाखोंच्या बक्षिसांची लयलूट
अलिबागसह जिल्हाभर गोविंदा पथके सज्ज
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर जिल्ह्यामध्ये आज (दि.5) गोपाळकाळा सण साजरा केला जाणार असून, दुपारपासून जिल्हाभर दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहावयास मिळणार आहे. दहीहंडी फोडण्यासह चार, पाच, सहा, सात, आठ तसेच नऊ थरांचे मानवी मनोरे उभारण्यासाठी जिल्ह्यातील गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित अलिबागमधील दहीहंडी उत्सवासह रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी दहीहंडीचा उत्सव रंगणार आहे. जिल्ह्यामध्ये तब्बल आठ हजार 870 ठिकाणी दहीहंड्या फोडल्या जाणार असून, गोविंदा पथकांसाठी लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
रायगड जिल्ह्यामध्ये गुरुवारी (दि.4) श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. पाळणा फुलांनी सजविण्यात आला. त्यानंतर मध्यरात्री कृष्णजन्म सोहळा साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील श्रीकृष्ण मंदिरांसह ग्रामीण भागात अनेक घरांमध्ये ही परंपरा जपण्यात आली. मंदिरांमध्ये विद्युत रोषणाईसह वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम सकाळपासून घेण्यात आले. अनेकांनी जिल्ह्यातील मंदिरांमध्ये गर्दी करून श्रीकृष्णाच्या मूर्तीचे दर्शन घेतले. श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर जिल्ह्यामध्ये गोपाळकाळानिमित्त आज (दि.5) दहीहंडीचा उत्सव साजरा केला जाणार असून, त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने हातात गदा घेऊन दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होणार आहे. जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक संस्थांच्या वतीने गोविंदा पथकांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. दहीहंडी सोहळ्यासह गाण्यांचे कार्यक्रम तसेच अन्य सामाजिक उपक्रमही या कालावधीत राबविले जाणार आहेत.
दहीहंडीचा उत्सव ग्रामीण भागात दुपारी बारा वाजल्यापासून सुरू केला जाणार आहे. ग्रामीण भागामध्ये दहीहंडी फोडण्यापूर्वी पारंपरिक पद्धतीने बाल्या नृत्यांचे सादरीकरण केले जाणार आहे. त्यानंतर दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. जिल्ह्यातील तालुका ठिकाणी वेगवेगळ्या संस्था, संघटनांच्या वतीने दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे.
दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. दहीहंडी फोडणाऱ्या पुरुष व महिला गोविंदा पथकाच्या अंतिम विजेत्या पथकाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, तसेच चारपासून सहा थरांची सलामी देणाऱ्या पथकाला आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. रिल्स स्पर्धांसाठीदेखील बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. अलिबागसह रोहा, मुरूड, पेण, पनवेल अशा अनेक तालुक्यांमध्ये लहान-मोठ्या दहीहंडीचे कार्यक्रम तसेच मिरवणुका काढल्या जाणार आहेत. जिल्ह्यामध्ये एक हजार 956 सार्वजनिक आणि सहा हजार 914 खासगी अशा एकूण आठ हजार 870 दहीहंड्या उभारल्या जाणार आहेत.
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रायगड जिल्ह्यात एक हजार 518 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. जिल्ह्यामध्ये एक हजार 450 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. त्यामध्ये 150 पोलीस अधिकारी, 950 पोलीस अंमलदार, 350 होमगार्ड, 68 वाहतूक पोलीस तसेच राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, आरसीपी दलाच्या चार, अतिशीघ्र दल एक, स्ट्रायकींग फोर्सच्या अकरा तुकड्यांचा समावेश असणार आहे.





