दुर्घटना रोखण्यासाठी प्रभावी सुरक्षा यंत्रणा उभारण्याची गरज; अत्याधुनिक साधनांसह जीवरक्षकांची नेमणूक महत्त्वाची
| आगरदांडा | प्रतिनिधी |
महाराष्ट्राला लाभलेल्या कोकण किनारपट्टीवर दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी येतात. सहलींचा हंगाम सुरू होताच पर्यटकांच्या बुडण्याच्या दुर्दैवी घटना घडत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तीन दिवसांपूर्वी बोलीपंचायत परिसरात शाळकरी आठ विद्यार्थ्यांच्या समुद्रात मृत्यूची घटना घडल्याने समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुरुड काशिद समुद्रकिनारा नावारूपाला आल्यापासून 125 पेक्षा जास्त पर्यटकांचा समुद्रात बुडुन मुत्यू झाला आहे. या घटना थांबवण्यासाठी प्रत्येक महत्त्वाच्या समुद्रकिनाऱ्यावर प्रशिक्षित आणि उत्तम पोहणाऱ्या तरुणांची जीवरक्षक म्हणून नियुक्ती करणे आवश्यक आहे. तसेच जीवरक्षकांना आवश्यक अत्याधुनिक सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
किनाऱ्यावर ठिकठिकाणी उंच वॉच टॉवर्स आणि सुरक्षा चौक्या उभारण्यात याव्यात. या ठिकाणांवरून जीवरक्षकांना समुद्रातील हालचाली आणि पर्यटकांवर लक्ष ठेवता येईल. समुद्रातील धोकादायक व खोल पाण्याचे पट्टे स्पष्टपणे दर्शविण्यासाठी लाल झेंडे, दिशादर्शक फलक आणि सूचना फलक लावणे गरजेचे आहे. पर्यटक समुद्रकिनारी दाखल झाल्यानंतर जीवरक्षक किंवा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना समुद्रकिनाऱ्याची माहिती, सुरक्षित क्षेत्र आणि धोकादायक भाग याबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात. पर्यटक धोकादायक भागाकडे जात असल्याचे निदर्शनास आल्यास मेगाफोन किंवा सायरनच्या माध्यमातून तत्काळ सावध करावे. तसेच स्थानिक पोलीस प्रशासनानेही समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षेवर नियमित देखरेख ठेवणे आवश्यक आहे. समुद्रकिनाऱ्यांची सुरक्षा ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून पर्यटक, पालक, शिक्षक आणि स्थानिक प्रशासन या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षा व्यवस्था सक्षम झाली आणि पर्यटकांनीही नियमांचे पालन केले, तर अनेक दुर्घटना टाळता येऊ शकतात. कोकणातील पर्यटन वाढावे, मात्र त्यासोबत पर्यटकांची सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस आणि प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.







