। पनवेल । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंड येथे एका चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. वाहनातून धूर आणि ज्वाळा दिसू लागल्याने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली.
मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा खिंड हा महत्त्वाचा मार्ग असून, या परिसरातून दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वाहतूक सुरू असते. अशातच एका चारचाकी वाहनाला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. वाहनाने नेमका कशामुळे पेट घेतला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तत्परतेने प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आग अधिक पसरण्याचा धोका टळला. महामार्गावरील वाहनांना तसेच परिसरातील प्रवाशांना संभाव्य धोका निर्माण होऊ नये, यासाठी अशा घटनांमध्ये तातडीने अग्निशमन दलाची मदत मिळणे महत्त्वाचे ठरते.






