| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
नवरात्रोत्सवातील अष्टमीच्या पूजेची तयारी आता सुरू झाली असून, पनवेलच्या जुन्या भाजी मार्केटमध्ये विविध रंगांच्या कमळांची रेलचेल पाहायला मिळत आहे. देवीच्या पूजेसाठी कमळाला विशेष महत्त्व असल्याने बाजारात रंगीबेरंगी कमळे विक्रीसाठी दाखल झाली आहेत. आकर्षक कमळे खरेदी करण्यासाठी महिला वर्गासह नागरिकांची बाजारात वर्दळ वाढू लागली आहे.
नवरात्रोत्सवातील आठवा दिवस म्हणजेच अष्टमी हा देवीच्या उपासनेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी अनेक भाविक देवीची विशेष पूजा-अर्चा करतात. पूजेसाठी लागणारी फुले, हार आणि अन्य साहित्य खरेदी करण्याची लगबग सध्या बाजारपेठेत सुरू झाली आहे. त्यातच विविध रंगांची कमळे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
पनवेलच्या जुन्या भाजी मार्केटमध्ये कमळांची खरेदी करण्यासाठी महिला आवर्जून येत आहेत. अष्टमीच्या दिवशी देवीला कमळ अर्पण करण्यासाठी अनेक भाविकांकडून या फुलांना पसंती दिली जाते. त्यामुळे अष्टमीच्या आधीच कमळांची खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या विविध रंगांच्या कमळांमुळे फुलविक्रेत्यांच्या दुकानांना आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात बाजारपेठेत फुलांची मागणी वाढत असते. अष्टमीच्या पूजेसाठी कमळांसह झेंडू, शेवंती आणि अन्य फुलांचीही खरेदी केली जाते. देवीच्या पूजेसाठी आवश्यक असलेले साहित्य एकाच ठिकाणी मिळत असल्याने जुन्या भाजी मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी वाढत असल्यामुळे पनवेलच्या जुन्या भाजी मार्केटमध्ये सणासुदीचा उत्साह अनुभवायला मिळत आहे.







