| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जतमधील जंगलतोड रोखण्यासाठी आणि सह्याद्री वाचवण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ हे गुरुवारी (दि.28) कर्जत येथे येणार आहेत. तर मराठा नेते मनोज जरांगे पाटील हेदेखील बुधवारी (दि.27) कर्जतमध्ये येऊन पाहणी करणार असून, दोघेही आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
कर्जत तालुक्यात सायडोंगर येथे हायड्रॉलिक पॉवर प्रकल्पासाठी हजारो झाडे तोडली जात आहेत. त्याविरुद्ध देशभर रान पेटले असून, स्थानिकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय काँग्रेसकडून वरिष्ठ पातळीवर दखल घेतली गेली आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी, बोगस परवानग्या बनवून पुढे नेले जाणारे प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही. जंगलाचा पर्यावरणाचा ऱ्हास देखील होऊ देणार नाही, अशी भूमिका स्थानिक पातळीवर जाऊन जाहीर करावी, अशा सूचना प्रदेश काँग्रेसला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ हे गुरुवारी कर्जत येथे येत असून, प्रत्यक्ष जंगलात जाऊन पाहणी करणार आहेत.त्यानंतर माध्यमांपुढे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची भूमिका जाहीर करणार आहेत. तत्पूर्वी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून कर्जत प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांना जंगलतोड आणि टोरंट प्रकल्पाला विरोध करणारे पत्र तालुकाध्यक्ष संजय गवळी यांनी सादर केले. त्यावेळी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दिनानाथ देशमुख, पक्षाचे युवक पदाधिकारी सुरज पंडित, लिलाधर देवळे, विजय हरिश्चंद्र, ऋषिकेश पवार आदी उपस्थित होते. तसेच, बुधवारी मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे कर्जत येथे येत आहेत. सकाळी नऊ वाजता कर्जत येथून पाली सायडोंगरकडे प्रयाण करणार आहेत. सायडोंगर भागात जंगलतोडीची पाहणी करून सकल मराठा समाज कडून पाठिंबा आणि भूमिका जाहीर करणार आहेत. सकल मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू केली असून, मोठ्या प्रमाणावर मराठा समाज येथे पोहचेल असे बोलले जात आहे.







