| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
भारत देश स्वतंत्र होऊन जवळजवळ 80 वर्षे पूर्ण होत असतानाही गावागावांमध्ये असलेल्या शुल्लकवादाचे रूपांतर वाळीत टाकण्याच्या प्रकारामध्ये आजही घडत आहेत. त्यामुळे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. अशीच घटना श्रीवर्धन तालुक्यातील शिरवणे गावात घडली आहे. येथील अखंड संघर्ष प्रतिष्ठान मंडळाने गावातील विनोद चिमण यांना एका शुल्लक कारणावरून वाळीत टाकण्याचा प्रकार घडला होता. मंडळाची बैठक झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून गावातल्या लोकांनी विनोद चिमण यांच्या कुटुंबियाजवळ बोलणे किंवा संबंध ठेवणे बंद केले. त्यानंतर विनोद चिमण यांचे मित्र अमरदीप पवार, शेखर शिंदे व नरेश धाडवे हे विनोद चिमण यांच्याबरोबर संबंध ठेवून असल्यामुळे त्यांच्याशी देखील कोणीही बोलू नये, असे ठरविण्यात आले. याबाबत विनोद चिमण यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यामध्ये रीतसर अर्ज दाखल केला असून, अद्यापपर्यंत पोलीस प्रशासनाकडून या अर्जावरती कोणत्याही प्रकारे चौकशी करण्यात आलेली नाही. हा प्रकार घडल्यानंतर गावच्या पोलीस पाटलांना विनोद चिमण यांनी याची लेखी कल्पना दिली होती. परंतु, पोलीस पाटलांनी सुद्धा या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा यासाठी विनोद चिमण यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दिला आहे. तरी श्रीवर्धन पोलीस ठाण्याने पीडीतांना लवकरात लवकर न्याय द्यावा, अशी मागणी पीडित कुटुंबियांनी केली जात आहे.







