जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
| रायगड | प्रतिनिधी |
एकीकडे रायगड जिल्ह्यात औद्योगिक क्रांती होत आहे. तर, दुसरीकडे भातशेती राखून विभाग कृषिप्रधान करण्याचे काम शेतकरी करीत आहेत. शेतीप्रधान उद्योग उभारण्यासाठी रामराज विभागातील ज्ञानी तरुण शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यांनी शेतीपूरक उद्योगामध्ये अग्रगण्य असणारी भात गिरणी उभारून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर दर्जेदार काम करून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण भाताची भरडाई करून देण्याचा संकल्प ज्ञानी ऍग्रो प्रोड्युसर कंपनीने करावा, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले. ज्ञानी ऍग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या कंपनीच्या राईस मिलचा शुभारंभ सोहळा रविवारी (दि.15) जयंत पाटील यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, द्वारकानाथ नाईक, मोहन धुमाळ, मानसी धुमाळ, अनिल पाटील, विक्रांत वार्डे, प्रमोद घासे, नौशाद मुजावर, अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अनंत पाटील, रायगड जिल्हा मजूर फेडरेशन अध्यक्ष हेमंत ठाकूर, अलिबाग पंचायत समिती सदस्य अंजली पाटील, चंद्रकांत बामणे, बाळू पाटील, सुरेखा झावरे, जयवंत तांबडकर, अरविंद कुलकर्णी, गजानन नाईक, यशवंत भगत, अशोक खोत, महेंद्र विद्रे, अबुल मुजावर, नामदेव तांबडकर, युसूफ चोगले, सुनील पाटील, गंगाराम शेळके, महादेव पाटील, रघुनाथ पाटील, जयवंत शेळके, संदेश वावेकर, रमेश गुंड, भिकाजी पाटील, नवनीत पाटील, नदीम बेबन, गणेश मढवी, मधुकर ढेबे, राकेश पालकर, उत्तम रसाळ, रवींद्र पाटील, महेश झावरे, सुशील पाटील, सुधीर पाटील, अलिम पठाण, प्रदीप रसाळ, राजेंद्र झावरे, संतोष झावरे आदी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, अलिबाग तालुक्यातील बहुतांश परिसर प्रामुख्याने भातशेती करणारा परिसर आहे. शेतकरी बांधवांच्या कष्टाचे चीज व्हावे, त्यांच्या मालाला योग्य भाव आणि प्रक्रिया सुविधा आपल्याच गावात मिळावी, ही काळाची गरज आहे. पूर्वी धान्यावर प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांना लांबच्या परिसरात जावे लागायचे, त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही खर्च व्हायचे. आज ही आधुनिक भात गिरण आपल्याच गावात सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी सोय होणार आहे. आजच्या तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता, शेतीपूरक व्यवसायाकडे आणि उद्योजकतेकडे वळणे अत्यंत गरजेचे आहे. मोहन धुमाळ यांनी ज्ञानी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड नावाने भात गिरणी सुरू करून हे धाडसी पाऊल उचलून इतर तरुणांपुढे एक उत्तम आदर्श ठेवला आहे. स्थानिक पातळीवर असे उद्योग उभे राहिले, तर गावातील तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध होईल आणि गावाची आर्थिक प्रगती होईल, असा मौलिक सल्ला जयंत पाटील यांनी दिला. अशा प्रकारच्या ग्रामीण उद्योगांना आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या उपक्रमांना माझे नेहमीच पूर्ण सहकार्य राहील. या भात गिरणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम आणि विश्वासार्ह सेवा द्या आणि या व्यवसायाची उत्तरोत्तर प्रगती करा, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.









