| नेरळ-माथेरान | प्रतिनिधी |
माथेरान शहरात लागू असलेली पाणी कपात सोमवारपासून लागू होणार असून, उल्हास नदीवरून पाणी उपसा करण्याचे प्राधिकरणाचे आश्वासन दिले आहे. माथेरान नळपाणी योजनेची तीन कोटींची थकबाकी असून, ती थकबाकी तत्काळ वसूल करण्याचा निर्णय झाला; मात्र, जे थकबाकी भरणार नाहीत त्यांची पाणी कनेक्शन कापण्याचा निर्णय घेण्यात आला. तर पावसाळ्यानंतर नेरळ येथून पाणी पुरवठा बंद आहे तो पाणी उपसा शुक्रवारपासून सुरू होणार आहे. तसेच, शारलॉट लेक मधील पाणी राखीव ठेवण्याचा निर्णय ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी घेतला असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी केली आहे.
माथेरानमध्ये पाणी कपात करण्याचा निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी जाहीर केला. त्यानंतर माथेरानचे नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी ग्रामसभा बोलवली होती. यावेळी नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उप नगरध्यक्ष संतोष शेलार, विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर आणि जीवन प्राधिकरणचे उप अभियंता स्वप्नील सुळे यांच्यासह सर्व नगरसेवक, व्यापारी फेडरेशन, राजकीय पक्षांचे प्रमुख आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. या सभेत, माथेरान शहरात पाणी कपात लावण्यात आली होती. ही पाणी कपात सोमवारपासून सुरू होईल. परंतु, त्यानंतर ख्रिसमस हंगामात कोणत्याही प्रकारची पाणी कपात लागू नसेल. तसेच, माथेरान शहरातील शारलोट लेकमधून पाणी उपसा करू नये आणि हे पाणी राखीव ठेवावे असा, निर्णय एकमताने घेण्यात आला. दरम्यान, पावसाळा संपल्यापासून आजपर्यंत कुंभे येथील उल्हास नदीवरून उचलले जाणारे पाणी येत्या शुक्रवारपासून पुन्हा उचलले जाणार आहे. तर, सोमवारपासून दिवसाआड पाणी कपात लागू केली जाणार असून शुक्रवार, शनिवार आणि रविवारी कोणत्याही प्रकारची पाणी कपात माथेरानमध्ये लागू नसेल. तर, ख्रिसमसमध्ये दि.20 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत पर्यटन हंगाम असल्याने कोणत्याही प्रकारची पाणी कपात होणार नसल्याचे जाहीर करण्यात आले.






