अंत्यसंस्कारासाठी उघड्यावर जागा शोधण्याची वेळ
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
एका बाजूला धनदांडग्यांसाठी आलिशान गोल्फ कोर्स, आधुनिक सुविधांचा झगमगाट; तर दुसऱ्या बाजूला आदिवासी बांधवांना मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी हक्काची जागाही नाही. आधुनिक खारघरच्या अगदी शेजारी असलेल्या धामोले आदिवासी वाडीतील हे विदारक वास्तव 32 वर्षीय सुभाष कातकरी यांच्या मृत्यूनंतर समोर आले. स्मशानभूमीअभावी त्यांच्या पार्थिवावर उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आदिवासी बांधवांवर आली. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या व्यवस्थेला हा थेट सवाल आहे.
धामोले आदिवासी वाडीच्या परिसरात धनदांडग्यांसाठी आधुनिक गोल्फ कोर्स उभारण्यात आला आहे. या गोल्फ कोर्सच्या परिसरातून आदिवासी वाडीकडे जाण्यासाठी रस्ताही आहे. मात्र, एका बाजूला गोल्फ कोर्सचा झगमगाट आणि दुसऱ्या बाजूला मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी जागेसाठी संघर्ष करणारे आदिवासी बांधव, असे विरोधाभासी चित्र पाहायला मिळाले. 32 वर्षीय सुभाष कातकरी यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे स्मशानभूमीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाडीला कायमस्वरूपी स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
मृत्यूनंतरही पदरी यातना
धामोले आदिवासी वाडीचा परिसर पनवेल महानगरपालिका क्षेत्रात येतो. त्यामुळे स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करून अंत्यविधीच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. आदिवासी बांधवांना मृत्यूनंतरही सन्मानाने अंत्यसंस्काराचा हक्क मिळणार की त्यासाठीही संघर्ष करावा लागणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
धामोले आदिवासी वाडीतील नागरिकांना अंत्यविधीसाठी स्मशानभूमी उपलब्ध नसण्ो ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आधुनिक खारघरच्या शेजारी राहणाऱ्या आदिवासी बांधवांना अंत्यसंस्कारासाठी जागा मिळू नये, ही खेदाची बाब आहे. पनवेल महानगरपालिकेने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन आदिवासी वाडीसाठी हक्काची स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी.
– लीला कातकरी, नगरसेविका, काँग्रेस







