उपासमारीमुळे हकनाक बळी
सेऊल | वृत्तसंस्था |
उत्तर कोरिया देश अण्वस्त्र चाचण्या आणि अमेरिकेसोबतच्या शाब्दिक चकमकींमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र एवढा मोठ्या देशाशी शत्रुत्व आणि एवढ्या महागड्या अण्वस्त्र चाचण्या घेणार्या देशातील जनता उपासमारीसारख्या संकटाला तोंड देत असेल यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र उत्तर कोरियात हीच सद्यस्थिती आहे. उत्तर कोरियामधील अन्न-धान्याचे संकट इतके तीव्र झाले आहे की तेथे खाण्यापिण्याची वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. एक किलो केळीची किंमत 3335 रुपये आहे, यावरून आपण तेथील महागाईचा अंदाज लावला जाऊ शकतो.
गेल्या काही दिवसांत लाखो लोकांना अन्नही मिळालेले नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन यांनी प्रथमच कबूल केले आहे की उत्तर कोरियात तीव्र अन्नाचा तुटवडा जाणवत आहे.
किम जोंग यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत सांगितले की, गेल्या वर्षीच्या वादळांमुळे पूर आला होता. त्यामुळे कृषी क्षेत्रात धान्य उत्पादनाचे लक्ष्य गाठू शकले नाही. उत्तर कोरियामधील हे उपासमारीचे संकट कोरोना व्हायरसच्या साथीमुळे उद्भवले आहे. उत्तर कोरियाने शेजारच्या देशांसह आपल्या देशाच्या सीमा बंद केल्या आहेत. यामुळे त्यांचा चीनबरोबरचा व्यापार कमी झाला.
उत्तर कोरिया अन्नपदार्थ, खते आणि इंधनासाठी चीनवर अवलंबून आहे. माध्यमांच्या माहितीनुसार उत्तर कोरियामध्ये एक किलो केळी 45 डॉलरपेक्षा जास्त म्हणजे 3300 रुपयांना मिळत आहे. तर चहा पावडरची किंमत 70 डॉलर म्हणजे 5200 रुपये आहे. तर एक कप कॉफीची किंमत 100 डॉलर्सपेक्षा जास्त आहे म्हणजेच 7300 रुपये आहे.