| वेलिंग्टन | वृत्तसंस्था |
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मंगळवारी 2025-26 या वर्षासाठी वार्षिक करार मिळालेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. त्यात 4 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, वार्षिक करार मिळालेल्या खेळाडूंच्या यादीत दिग्गज केन विलियम्सनचे नाव नसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
विलियम्सन न्यूझीलंडचा प्रमुख खेळाडू आहे. दरम्यान, केन विलियम्सनने न्यूझीलंडकडून देण्यात येणारा वार्षिक करार नाकारला आहे. त्याने गेल्यावर्षी देखील विविध ठिकाणच्या टी-20 लीग स्पर्धा खेळण्यासाठी हा करार नाकारला होता. आता यावर्षीही त्याने हा करार नाकारला आहे. त्यामुळे आता त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कार्यकाळावर प्रश्नचिन्ह आहे. तो निवृ्त्तीचा विचार करतोय का, असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. आगामी झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो खेळण्याची शक्यता कमी आहे. तथापि, विलियम्सनने गेल्यावर्षी जरी वार्षिक करार नाकारला असला, तरी त्याने न्यूझीलंड संघाप्रती असलेली वचनबद्धता पाळली होती. त्याने गेल्या वर्षभरात न्यूझीलंडने खेळलेल्या 13 कसोटी सामन्यांपैकी 9 सामने खेळले होते आणि 1000 पेक्षा अधिक धावाही केल्या होत्या. त्याप्रमाणेच आता यावर्षीही तो करार नाकारूनही न्यूझीलंडसाठी खेळणार असल्याची शक्यता आहे. त्याने गेल्या महिन्यात याबाबत संकेतही दिले होते.