जो रूटची विक्रमाला गवसणी
| लंडन | वृत्तसंस्था |
तब्बल 22 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळायला आलेल्या झिम्बाब्वेचे यजमानांनी चांगलेच स्वागत केले आहे. झॅक क्रॉली, बेन डकेट व ऑली पोप यांनी शतकी खेळी करताना धावांचा डोंगर उभा केला. जो रूटला मोठी खेळी करता आली नसली तरी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
दरम्यान, झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीला बोलावले. झॅक व बेन यांनी पहिल्या बळीसाठी 231 धावांची भागीदारी केली. ही भागीदरी इंग्लंडसाठी घरच्या मैदानावरील सलामीवीरांकडून झालेली तिसरी सर्वोत्तम भागीदरी ठरली. आहे झॅक 171 चेंडूंत 124 धावांवर बाद झाला. त्याआधी बेन डकेट 134 चेंडूंत 140 धावांवर झेलबाद झाला होता. झॅकने दुसऱ्या बळीसाठी ऑली पोपसह शतकी भागीदारी केली. पोप 154 चेंडूंत 163 धावांवर अजूनही खेळत आहे. त्यामुळे इंग्लंडकडून एकाच डावात आघाडीच्या तीन फलंदाजांनी शतक झळकावण्याची ही चौथी वेळ आहे. त्यानंतर रूट 44 चेंडूंत 34 धावांवर बाद झाला, परंतु त्याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रूटने 34 धावांच्या खेळीसह कसोटी क्रिकेटमध्ये 13 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. जगात फक्त पाच फलंदाजांनाच हा पराक्रम करता आला आहे. या आधी सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस, रिकी पाँटिंग, राहुल द्रविड यांनीच हा टप्पा ओलांडला होता.