घंटासह हजारोंच्या वस्तू लंपास
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
भुईबावडा येथील तीन मंदिरे अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास फोडुन घंटासह हजारो रूपये किमंतीच्या वस्तू लंपास केल्याची घटना घडली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधार घेवून पोलिसांनी तपास सुरू केला असून, महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती आल्याची माहिती आहे. मात्र, भरवस्तीत झालेल्या या चोरीने परिसरात खळबळ माजली आहे.
भुईबावडा गावात श्रीदेव रवळनाथ, श्रीदेव गांगेश्वर आणि श्रीदेव विठ्ठल अशी तीन मंदिरे आहेत. यातील दोन मंदिरे ही बाजारपेठेत आणि वस्तीत आहेत. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पुजारी सुभाष यशवंत गुरव हे मंदिरात गेले असताना त्यांना मंदिरांचा दरवाजा उघडा दिसला. याशिवाय अन्य खोल्यांचे दरवाजे देखील उघडे दिसून आले.
फंडपेटी देखील फोडल्याची दिसून आली. त्यामुळे त्यांनी जेवण बनविण्याचे साहित्य असलेली खोली जावुन पाहिली असता त्या खोलीतील साहित्यही चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. याच वेळी बाजारपेठेत वस्तीत असलेली श्रीदेव गांगेश्वर आणि श्रीदेव विठ्ठल या दोनही मंदिरामध्ये चोरी झाल्याचेही उजेडात आले.
याबाबत माहिती पोलीसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील, मारूती साखरे, अभिजीत तावडे, राहुल तळसकर, सुनील पडेलकर आदी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रवळनाथ मंदिरात जावुन पाहीले असता मंदिरातील बहुतांशी वस्तू चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
रवळनाथ मंदिरातील तीन घंटा, पुजेचे सर्व साहित्य, 40 स्टीलची ताट, 250 प्लास्टीक थाळ्या, 4 पितळी टोप, तीन समई, एक मिक्सर याशिवाय मंदिरातील हंडा, कळश्या, तांब्या, पेले, वगराई, स्टील टाक्या, गॅस शेगडी आदी 20 हजाराहून अधिक किंमतीच्या वस्तू चोरीस गेल्या. गांगेश्वर मंदिरातील 21 घंटा आणि इतर साहित्य तर विठ्ठल मंदिरातील पाच घंटा अशा हजारो रूपये किंमतीच्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.
भरवस्तीतील मंदीरे चोरट्यांनी फोडल्यामुळे गावात खळबळ माजली आहे. पोलीसांनी सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. भुईबावडा बाजारपेठेत रात्री येर्याझार्या घालणार्या एका गाडीवर पोलीसांचा संशय असून त्या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत. या गाडीचा शोध पोलीसांनी सुरू केला आहे. ती गाडी रात्री दीड दोन वाजण्याच्या सुमारास नेमकी का फिरत होती? याचा उलगडा झाल्यानंतर पोलीसांच्या हाती ठोस धागेदोरे सापडण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील करीत आहेत.







