क्रिकेट स्पर्धेतून मिळालेल्या पैशाचा सदुपयोग
। रसायनी । वार्ताहर ।
सध्या क्रिकेट सिझन असल्याने आजकाल क्रिकेटच्या स्पर्धा भरवून त्यातून मिळणार्या पैशातून चंगळ आणि मौज मजा करण्याचा तरुणांचा कल असतो. मात्र या चंगळ करण्याला छेद देत विंधणे येथील फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुपने क्रिकेट स्पर्धेतून मिळणार्या फायद्यातून गावात सीसीटीव्ही बसवले. त्यांच्या या उपक्रमाबद्दल गावातील ग्रामस्थांनी त्या तरुणांचे कौतुक केले आहे.
या ग्रुपतर्फे खुल्या क्रिकेटच्या स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी गावातील अनेक मान्यवरांनी त्यांना देणगी म्हणून पारितोषिक दिले होते. यावेळी पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेत या ग्रुपला 40 हजार रुपयांचा फायदा झाला होता. मात्र या तरुणांनी आपल्या गावाशी ऋणानुबंध जपताना गावाच्या सुरक्षेसाठी गावातील हनुमान मंदिर आणि बस स्टॉपजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. यासाठी तुषार थळी यांनी मोफत इंटरनेटची सोय उपलब्ध करून दिली आहे. तरुणांच्या या उपक्रमांमुळे गावातील घडामोडींवर लक्ष ठेवणे शक्य झाले आहे. फेंडस फॉर एव्हर ग्रुप मधील राजन लोखंडे, प्रल्हाद पाटील, प्रदिप शेळके, कल्पेश पाटील, समाधान जोशी, सुरज पाटील, अमर पाटील, अशोक शिंदे, आशिष पाटील, किरण पाटील, सिताराम थळी, संदेश पाटील, अक्षय पाटील आदींचे नागरिकांनी कौतुक करुन केले आहे.