। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
युक्रेन-रशिया वादामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींचा भडका उडाला आहे. कच्च्या तेलाच्या किंमती 99 डॉलर प्रति बॅरलच्या विक्रमी टप्प्यावर पोहोचल्या आहेत. ब्रेंट क्रूडचा भाव 99.5 डॉलर प्रति बॅरल झाला आहे. सप्टेंबर 2014 नंतर कच्च्या तेलाचा विक्रमी भाव ठरला आहे. रशिया-युक्रेन वाद शमण्याची चिन्हे दिसत नाही. रशियाने युक्रेनच्या विरोधात आक्रमक पवित्रा धारण केला आहे. त्यामुळे युक्रेनच्या मुद्द्यावरुन रशिया व युरोप यांच्यातील संबध ताणण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावाचा फटका कच्च्या तेलाच्या किंमतीला बसला आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, क्रूड तेलाच्या किंमती 100 डॉलर प्रति बॅरल वर पोहोचू शकतात. देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा देखील भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.