। उरण । वार्ताहर ।
उरण, पनवेल तालुक्याच्या सीमेवर जासई-वहाळ हद्दीत असलेल्या दगडखाणी आणि स्टोन क्रशरच्या धुरळ्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. महसूल विभागाच्या आशिर्वादाने शासनाचे नियम धाब्यावर बसवून दिवस-रात्र या भागात क्रशर आणि बेसुमार दगडांचे उत्खनन सुरू असून यामुळे उडणार्या धुरळ्याने वहाळ-उलवे नोड आणि जासई परिसरातील नागरीक त्रस्त झाले आहेत. फक्त या परिसरातच 30-35 दगड खाणी आणि 20-22 क्रशर आहेत.
खाणपट्टा संपल्यानंतरही त्या खाणपट्ट्यातून कोट्यावधी रूपयांचे गौण खनिजाचे उत्खनन करून पर्यावरणाचे अतोनात नुकसान या दगड माफियांनी केले आहे. या संदर्भात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि वहाळ ग्रामपंचायतीने पर्यावरण विभाग आणि महसूल विभागाकडे तक्रारी दिल्या असून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या परिसरात अनेक क्रशर आणि दगड खाणी या अनधिकृत असून त्यांना महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाची परवानग्या नसल्याचे पुढे आले आहे. या परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात नियमबाह्य दगडांचे उत्खनन करण्यात आले असून येथे एक प्रचंड आकाराचे सरोवर तयार झाले आहे. संपूर्ण उरण तालुक्याला या दगडखाणीत असलेले पाणी पूरेल एवढे पाणी या कृत्रिम सरोवरात आहे.
दिवसरात्र या भागातून धुळीचे लोट उडत असतात. रात्रीच्या सुमारास तर या परिसरात प्रचंड धुळीचे ढग तयार होतात, कधी कधी तर यामुळे समोरचा माणूस दिसत नाही असे वहाळ ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे या परिसरात प्रचंड प्रदुषण होत असून त्याचा नागरीकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
या परिसरात असलेल्या क्रशर आणि दगडखाणीतून उडणार्या धूळीबाबत ग्रामपंचायतीने अनेकवेळा महसूल विभाग, सिडको आणि एमपीसीबीकडे तक्रारी दिल्या आहेत मात्र त्याची दखल घेत नाहीत. प्रशासनाने या दगडखाणींतून होणार्या प्रदुषणाची तातडीने दखल घ्यावी.
पूजा पाटील, सरपंच, वहाळ ग्रामपंचायत
या दगडखाण आणि क्रशरच्या खाणींच्या मालकांनी ग्रामपंचायतीची परवानगी घेतलेली नाही. अनेक खाणमालक तर ग्रामपंचायतीला कर देखिल देत नाहीत.
संतोष घरत सरपंच, जासई ग्रामपंचायत
आम्ही सर्व दगडखाण आणि क्रशर चालकांना प्रदुषण होणार नाही या बाबत काळजी घेण्यास सांगितले आहे. तसेच धुरळा उडू नये म्हणून सतत पाण्याची फवारणी केली जाते.
सुनिल भोईर, अध्यक्ष, श्री कान्होबा दगडखाण आणि क्रशर चालक मालक संघ
प्रदुषण पसरविणार्या आणि शासनाचे नियम न पाळणार्या दगडखाणींवर आणि क्रशरवर कारवाई केली जाईल. तसेच याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाला कारवाई करण्याबाबतचे तातडीने पत्र देण्यात येईल असे सांगितले.
राहुल मुंडके, उपविभागीय अधिकारी, पनवेल