दोषींवर कारवाई करण्याची शेकापची मागणी
बेरोजगार संघटनेचा लाक्षणिक उपोषणाचा इशारा
| गोवे-कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील श्रीमंत समजल्या जाणार्या ऐनघर ग्रामपंचायतीमध्ये कोट्यवधींचा अपहार झाला असून, यातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचा अर्ज शेतकरी कामगार पक्ष आणि ऐनघर ग्रामीण बेरोजगार संघटनेकडून विभागीय आयुक्त, कोकण भवन यांना देण्यात आला आहे. याआधीसुद्धा गटविकास अधिकार्यांकडे अर्ज देण्यात आले आहेत, परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याने लाक्षणिक उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
ऐनघर ग्रामपंचायतीमध्ये सन 2018 ते 2019, 2019 ते 2020, 2020 ते 2021 या आर्थिक वर्षात 14 व्या वित्त आयोग व जनरल फंडातून कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला असल्याची माहिती अधिकारात मिळवलेल्या कागदपत्राच्या आधारे निदर्शनास आल्याने माजी उपसरपंच व शेकापचे ज्येष्ठ नेते महादेव मोहिते यांनी दि.21/9/2020 रोजी, तर ऐनघर ग्रामीण बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश देवराम कातकरी यांनी दि.3/9/2020 रोजी विभागीय आयुक्त कोकण भवन येथे अपहाराची चौकशी करावी, असा अर्ज दाखल केला होता.
या अगोदर अहवालाची चौकशी झाली नसल्याने व रोहा गटविकास अधिकारी या बाबत कोणतीही कार्यवाही करत नसल्याने ऐनघर बेरोजगार संघटना यांनी रोहा पंचायत समिती कार्यालया समोर दि.1/10/2021 रोजी लाक्षणिक उपोषण करण्याचे ठरविले होते. परंतु रोहा गट विकास अधिकारी यांनी दोषी व्यक्तींवर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन लेखी पत्राने दिले होते. मात्र, आजतागायत यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे.
अधिकार्यांचे कारवाईकडे दुर्लक्ष
माहितीच्या अधिकाराखाली ऐनघर ग्रामपंचायतीचा लेखा परीक्षण अहवाल रोहा पंचायत समितीला दिला आहे. या अहवालामध्ये कोट्यवधी रुपयांचा व्यवहार अनियमितपणे केलेला आहे. एक वेळा तर ऐनघर ग्रामपंचायतीमधील याचे पुरावे नष्ट करण्यासाठी फाईल चोरीचा ही प्रकार घडला असल्याचा उघड झाला आहे. परंतु, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958चे कलम 14 ग. प्रमाणे कार्यवाही करावी असे नमूद केले असताना गटविकास अधिकारी कार्यवाही करीत नसल्यामुळे दि.1/10/2021 रोजी स्थगित केलेले उपोषण पुन्हा मंगळवार दि.22/3/2022 रोजी रोहा पंचायत कार्यालयासमोर करणार असल्याचे ऐनघर ग्रामपंचायत माजी उपसरपंच महादेव मोहिते व बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश कातकरी यांनी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.