। चिपळूण । प्रतिनिधी ।
तालुक्यातील डेरवण यूथ गेम्स स्पर्धेत धनुर्विद्या प्रकारात सातार्याच्या खेळाडूंनी वर्चस्व प्रस्थापित केले. इंडियन, कंपाऊंड आणि रिकर्व्ह अशा तीन प्रकारात ही स्पर्धा खेळविण्यात आली. सातार्यासह कोल्हापूर, पुणे, सोलापूर, मुंबई, रायगड, धुळे, अहमदनगर आदी ठिकाणांहून सुमारे 100 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. 10, 14 व 18 वयोगटात ही स्पर्धा खेळविण्यात आली. धुळ्याच्या श्रनया सोनवणे हिने दहा वर्षे वयोगटात 10 मीटरमध्ये रिकर्व्ह राऊंड या प्रकारात 180 पैकी 178 गुण मिळवून या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली.
मल्लखांब विभागात डेरवणच्या श्रीराम भागवत याने तर मुलींमध्ये सातार्याच्या आर्या साळुंखे हिने अव्वल गुण मिळवून स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळविला. राज्यातील 13 जिल्ह्यातून मुलांमधून 102 मुले तर मुलींमधून 108 खेळाडूंनी विक्रमी सहभागाने स्पर्धा गाजविली. स्पर्धेला श्री छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेते सुजित शेडगे, विश्वजित मोहिते, आदित्य आहिरे आदी मान्यवर उपस्थित होते. रणवीर सावंत यांनी स्पर्धा प्रमुख म्हणून जबाबदारी संभाळली. विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्र, रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले.