। बोर्लीपंचतन । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनक्षेत्र दिवेआगर येथील प्राचीन देवस्थान सिद्धनाथ भैरव व केदारनाथ (भैरी) या देवतांच्या दर वर्षी चैत्र शुद्ध चतुर्दशी आणि पौर्णिमेला होणार्या व महाराष्ट्रभरात प्रसिद्ध असणार्या यात्रा दोन वर्षाच्या खंडानंतर यावर्षी 15 व 16 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिभावात पार पडल्या.
दिवेआगरमधील या प्रसिद्ध यात्रांना कित्येक वर्षाची प्राचीन परंपरा असून सकाळी गावातील धार्मिकदृष्ट्या महत्वाच्या प्राचीन देवतांच्या स्थानांची मानकर्यांच्या हस्ते गावामध्ये परडी काढून देवतांचा मान-सन्मान व पूजा विधी तसेच भाविकांकडून केले जाणारे हातखोड्यांचे नवस या प्राचीन काळापासून चालत आलेल्या धार्मिक विधींना अनन्यसाधारण महत्व आहे.
अशा या दोन्ही यात्रांचे मुख्य आकर्षण म्हणजे सूमारे तीस फूट उंचावरील आडव्या लाटेला पांडवांच्या नावाने हाक देत पाठीत लोखंडी गळ टोचून पाच फेर्या गळी फिरवला जातो. ही प्राचीन परंपरा या देवस्थानांच्या असणार्या पुजार्यांच्या कुटुंबांकडे आहे सिद्धनाथ भैरव या मंदीराच्या पूजेचा आणि गळाचा मान दिवेआगर येथील माळी समाजाच्या विरकूड घराण्याकडे तर केदारनाथ (भैरी) या मंदीराचा मान बोर्लीपंचतन येथील कुंभार समाजाच्या दिवेकर घराण्याकडे आहे.
दोन दिवस चालणार्या या जत्रोत्सवासाठी पंचक्रोशीतील भावीकांसह जिल्ह्याबाहेरील असंख्य लोक आवर्जून हा दैवी चमत्कार पाहण्यासाठी गर्दी करतात. मिठाई, खेळणी,चणे कुरमुरे, हॉटेल अशा छोट्या मोठ्या व्यावसायिकांना यातून चार पैसे मिळण्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि शासनालासूद्धा यातून चांगला महसूल मिळत असतो.






