धनगरांचे कुटुंब कबिला होतोय मार्गस्थ
। पाताळगंगा । काशिनाथ जाधव ।
गेले आठ महिने कोकणात चार्यासाठी आलेल्या मेंढरांना आता पावसाची चाहूल लागताच आपल्या गावची ओढ लागल्याचे जाणवू लागले आहे. त्यामुळे आता महामार्गावर मेंढरांचे कळप गावाकडे मार्गस्थ होत असल्याचे चित्र दिसत आहे.त्यांच्यासोबत मेंढपाळही आपला कुटुंबकबिला घोड्यांच्या पाठीवर लादून हातात काठी घेऊन मेेंढरांना आवाज देत मार्ग क्रमण करु लागले आहेत. पावसाळ्यात घाटमाथ्यावर चार महिने या मेंढ्यांना मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होत असतो. परंतु पाऊस संपला की पुन्हा एकदा हा धनगर समाज आपल्या जवळील असलेला लवाजमा घेऊन कोकणात येत असतात.
साधारण दिवाळी दरम्यान या मेंढपाळांचे कोकणात आगमन होत असते. पावसाळ्यात विविध प्रकारची काटेरी वनस्पती निर्माण होत असते.यामुळे त्यांच्या चार्यांचा प्रश्न मार्गी लागत असतो. कोकणात आल्यानंतर मेंढपाळांचा प्रपंच आज इथे तर उद्या तिथे असा असतो.जिथे मेंढरे बसतात त्या शेतातच मेंढपाळ आपला संसार थाटून वास्तव्य करुन असतो. ऑक्टोबर-नोव्हेंबर ते मे -जून दरम्यान त्यांचा सारा प्रपंच उघड्यावरच असतो. मेंढ्यांच्या चार्यासाठी मेंढपाळ सुमारे 250 ते 300 किलोमीटर भटकंती करतात. दरम्यान, यावेळी मोसमी पाऊस पडू लागल्याचे चिन्हे निर्माण होत असल्यामुळे मेंढपाळ मेंढयांचा कळप घेऊन आपल्या घरी परतीची वाट धरू लागले आहेत. पाऊस उशिरा पडला किंवा पावसाने दडी मारली तर मेंढपाळांचा मुक्काम वाढत असतो.यंदा मात्र ते वेळेआधीच मार्गस्थ होताना दिसत आहेत







