पालिकेकडे अद्याप निधी पोहोचला नाही
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत शहरातील मध्य रेल्वेच्या भिसेगाव-डेक्कन जिमखाना कर्जत यांना जोडणारा भुयारी मार्ग मध्य रेल्वे बांधणार आहे. एमएमआरडीएने 15 कोटी रुपयांचा निधी या भुयारी मार्गासाठी दिला असून, त्या ठिकाणी भुयारी मार्ग व्हावा यासाठी 32 वर्षांपूर्वी आंदोलन उभे राहिले होते. मात्र, खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नाने नगरविकास विभागाने मंजूर केलेला निधी अद्याप कर्जत नगरपरिषदेला पोहोचला नाही. दरम्यान, खासदार शिवसेनेचा, आमदार शिवसेनेचा, कर्जतच्या नगराध्यक्षा शिवसेनेच्या आणि राज्याचे नगरविकास मंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे आहेत, तरीदेखील भुयारी मार्गाचे मंजुरी दिलेला निधी पोहोचला नाही, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
कर्जत शहर आजपर्यंत दोन भागात विभागले असून, कर्जत शहर, मुद्रे, आकुर्ले, दहिवली हा भाग पूर्वेकडे, तर भिसेगाव आणि गुंडगे हा भाग पश्चिम बाजूस आहे. कर्जत आणि दहीवली ग्रामपंचायत यांची कर्जत नगरपरिषद 1992 साली स्थापन झाल्यानंतर या दोन भागात विभागलेल्या शहराला एक अविभाज्य भाग बनविण्यासाठी तत्कालीन सरपंच अनंत जोशी यांनी लढा पुकारला. त्या ठिकाणी वाहनांसाठी फाटक होते आणि ते फाटक बंद करण्याचा घाट मध्य रेल्वेकडून घालण्यात आल्यानंतर अनंत जोशी यांनी भिसेगाव गुंडगे या भागातील जनतेला एकत्र आणले आणि भुयारी मार्गाचा लढा सुरू झाला. त्या ठिकाणापासून 500 मीटर अंतरावर रेल्वेने उड्डाण पूल बांधल्याने दुसरा उड्डाण पूल होऊ शकत नाही आणि म्हणून भुयारी मार्गाची मागणी होऊ लागली होती. सुरुवातीला हा लढा भिसेगाव फाटक संघर्ष समिती फाटक बंद होऊ नये म्हणून करीत होती; परंतु रेल्वे कडून फाटक बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि संघर्ष समितीला मग फाटक बंद होऊ नये म्हणून आंदोलन करावे लागले. यातून सुरू झालेले उपोषण आणि त्यातून झालेले आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यात संघर्ष समितीच्या अनेकांना पोलिसी बळाचा मार खावा लागला.हे सर्व कर्जत शहराने अनूभावले असल्याने आणि कर्जत शहराला कायम भुयारी मार्ग होत नाही याची खंत असायची. त्यातून राज्य सरकारच्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने कर्जत येथील भुयारी मार्ग बांधण्यासाठी निधी देण्याचे जाहीर केला आहे.
खासदार बारणे यांनी पुढाकार घेवून भूयारी मार्गाचे काम मंजूर करून आणले होते, त्यामुळे या कामाला निधी वर्ग झाला नाही काय की एमएमआरडीए कडे भुयारी मार्गाच्या उभारणी साठी 15 कोटींचा निधी नाही की हे काम प्राधिकरण कडून रद्द करण्यात आले आहे. याबद्दल माहिती आता कर्जतकर नागरिक शासनाकडे आणि पालिकेकडे मागू लागले आहेत.दूसरीकडे कर्जत नगरपरिषद कडे मागील पाच महिन्यात भुयारी मार्ग उभारण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कडून कोणताही निधी आलेला नाही अशी माहिती दिली जात आहे.
दरम्यान, कर्जत शहर आणि भिसेगव परिसर ज्या भुयारी मार्गामुळे एकसंघ होणार होता, तो भुयारी मार्ग 32 वर्षांनंतर देखील होणार नसेल तर मात्र स्थानिकांची उपेक्षा हे सरकार करीत आहे काय?असा प्रश्न कर्जतकर उपस्थित करू लागले आहेत.







