। अलिबाग । प्रतिनिधी ।
सध्या रायगड जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. मात्र समुद्र खवळला असून लाटांचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याबाबत हवामान खात्याने चार दिवस मोठी भरती असल्याचा सूचक इशारा मंगळवारी दिला होता.
त्यानूसार मच्छीमारांनी नौका खाडीपात्रात सुरक्षित ठिकाणी हलविल्या तर काहींनी समुद्रातून बाहेर काढल्या. अलिबाग समुद्रकिनारी मंगळवारी उसळणार्या लाटांचा आस्वाद घेण्यासाठी किनार्यावर गर्दी केली होती. मात्र समुद्र खवळला असून फोटोग्राफीच्या मोहाला मुरड घाला आणि समुद्र किनार्यावर न जाण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
मंगळवारी वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून समुद्र खवळला होता. लाटांचा वेगही वाढला होता. अलिबागमधील पार्किंगमध्येही उधाणाचे पाणी शिरले होते. खवळलेल्या त्या लाटांचे चित्तथरारक व्हिडिओ सोशल मिडियावरही चांगलेच व्हायरल होत आहेत. मात्र फोटो अथवा व्हिडिओ काढण्याच्या मोहाला आवर घाला आणि समुद्रकिनारी जाऊ नका, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.