। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
मुरूड एसटी आगारात प्रवाशी सुविधांचे बारा वाजले असून येणार्या प्रवाशांना मोठ्या असुविधा आणि गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. आगारात प्रवाशांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध नाही. प्रवाशी प्रतीक्षालयात पंखे नाहीत, शौचालयात पाणी नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. रात्री प्रवाशी शेडजवळ लाईटची सुविधा नसल्याने जनावरांचा दंश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या समस्या त्वरित दूर न झाल्यास जनआंदोलन करण्यात येईल असे निवेदन पद्मदुर्ग व्यवसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी अनघा बारटक्के विभाग नियंत्रक रायगड विभाग पेण यांचेकडे दिले आहे. या गैरसोयी राज्य परिवहन रायगड विभागाने दूर कराव्यात असे न झाल्यास नाईलाजाने प्रवाशी हितासाठी जनआंदोलन करणे भाग पडेल असे गायकर यांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रति तहसीलदार मुरूड, मुरूड पोलीस निरीक्षक यांना देखील गुरुवारी देण्यात आल्या आहेत.