अलिबाग व मुरुड मेडिकल असोसिएशनच्यावतीने क्रीडा स्पर्धा
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग, मुरुडमधील डॉक्टरांनी डॉक्टर व त्यांच्या कुटुंबियासाठी क्रीडा स्पर्धा अलिबागजवळील आरसीएफ वसाहतीमधील क्रीडा संकुलात आयोजित केली होती. वैद्यकीय उपचाराबरोबरच शरीर फिट ठेवण्यासाठी वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकार महत्त्वाचा असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. त्यांच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अलिबाग व मुरुड मेडिकल असोसिएशनच्यावतीने क्रीडा स्पर्धा भरविण्यात आली होती. त्यामध्ये क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम, टेबल टेनिस आदी स्पर्धांचा सहभाग होता. या स्पर्धेत एकूण 153 डॉक्टरांसह त्यांचे कुटुंबिय सहभागी झाले. या क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ रायगड जिल्हा युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष यतीराज पाटील, डॉ. महेंद्र दोषी या मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी अलिबाग-मुरूड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गणेश गवळी, माजी अध्यक्ष डॉ. मयूर कल्याणी, डॉ. आशिष भगत, डॉ. संदेश पाटील, डॉ. अनघा भगत, डॉ. रवि म्हात्रे, डॉ. मकरंद आठवले, डॉ. राजेंद्र मोकल, डॉ. प्रमोद खानावकर, असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. सोनाली नाईक, डॉ. प्रणाली पाटील, डॉ. अमेय केळकर, डॉ. रेखा म्हात्रे, डॉ. राजाराम हुलवान, डॉ. वसीम पेशमाम, डॉ. सुबोध पाटील आदी मान्यवरांसह डॉक्टर्स व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
अलिबाग व मुरुड मेडिकल असोसिएशनच्यावतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धा म्हणजे स्तुत्य उपक्रम आहे. धावपळीच्या जीवनात नागरिकांचे आरोग्यकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे अनेक आजारांना नागरिकांना बळी पडावे लागत आहे. परंतु, वैद्यकीय उपचाराबरोबरच मानसिक व शारीरिक तणावापासून मुक्ती मिळविण्यासाठी नियमित कसरत व खेळणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन भरविलेल्या या स्पर्धेतून शरीर सुदृढ ठेवण्याचा संदेश देण्यात आला असल्याचे यतीराज पाटील यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले.







