जनमानसातून नाराजीचा सूर
| पाली | वार्ताहर |
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येणार्या उन्हेरे फाटा ते उद्धरपर्यंतच्या मार्गाचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून, रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या प्रतिक्रिया जनमानसातून उमटताना दिसून येत आहेत.
दहा कि.मी.चे अंतर असलेला हा मार्ग आहे. या मार्गावर अनेक महत्त्वाची व दाट लोकसंख्या असलेली गावे, वाड्या-वस्त्या आहेत. हा मार्ग पुढे महागाव, पेण, चंदरगाव, हातोंडकडून खोपोलीकडे जातो. या मार्गावरून एसटी बसेससह मोठ मोठी अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालू असते. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा व मजबूत असणे गरजेचे आहे. परंतु, सद्यःस्थितीत चालू असलेले रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून, रस्त्यासाठी डांबर कमी प्रमाणात वापरली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून येताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी नागरिकांनी उठवलेल्या आवाजामुळे संबंधित खात्याचे अधिकारी चालू कामाची देखरेख करताना दिसले; परंतु पुन्हा परिस्थिती जैसे थे असून, ठेकेदाराच्या कामगारांच्या देखरेखीखाली रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमधून शंका उपस्थित केली जात आहे.
सदर रस्त्याचे काम हे दहा कि.मी.चे असून, तीन टप्प्यातील आहे. पहिला टप्पा उन्हेरे फाटा ते उद्धर सात कि.मी., पुढील टप्पा देऊलवाडी ते कोंडप दोन कि.मी. व उर्वरित एक कि.मी. असा मार्ग असून, याकरीता शासनाचा जवळपास पाच कोटी एवढा निधी उपलब्ध झाला आहे.
रस्त्याचे अतिशय दर्जाहिन काम सुरू आहे. शिवाय रस्त्यावर स्प्रे करत असलेली डांबर पसरलेल्या दगडांमध्ये बाँडिंगचे काम करते, त्यामुळे सध्या स्प्रे होत असलेल्या डांबरामुळे दगड नीट कव्हर होत नाहीत, तर बाँडिंग कशी होणार. रस्त्याचा जो बेस आहे तोच मजबूत नसल्याने रस्त्यावरचे मटेरियल निघून पुढील काळात रस्ता वर्षभर तरी टिकेल की नाही, यात शंका आहे.
रवींद्रनाथ ओव्हाळ
सामाजिक कार्यकर्ते







