पनवेल | वार्ताहर |
जेएनपीटी बंदरात आयात झालेल्या व कस्टम विभागाने पुढील कारवाईसाठी सोनारी गाव येथील स्पीडी सीएफएस या वेअर हाऊसमध्ये ठेवलेल्या पाच संशयास्पद कंटेनरमधील तब्बल 55 लाख रुपये किंमतीच्या मालाची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी यातील दोन कंटेनरमध्ये असलेला सिगारेटचा साठा चोरुन त्याऐवजी या कंटेनरमध्ये जुने कपडे व वस्तू ठेवल्याचे आढळून आले आहे. न्हावा शेवा पोलिसांनी कस्टम विभागाने दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.
कस्टम विभागाकडून पकडण्यात आलेले संशयास्पद कंटेनर सोनारी गाव येथील ज्या स्पीडी सी.एफ.एस या वेअरहाऊसमध्ये ठेवण्यात येतात, त्याठिकाणी कायम सुरक्षारक्षक तैनात असताना देखील आतमध्ये ठेवण्यात आलेले सिलबंद कंटेरन फोडून त्यातील 55 लाख रुपये किंमतीच्या मालाची चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.