| पाली/गोमाशी | वार्ताहर |
रायगड जिल्हा व सुधागड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भैरिनाथ क्रीडा मंडळ वावे यांच्यावतीने कै. गणेशदादा यादव स्मृतिचषक तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन शनिवार, दि. 4 रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाथभैरव झाप या संघाने स्वयंभू हनुमान चिवे संघास पराभूत करून कै. गणेशदादा यादव स्मृतिचषकावर आपली मोहोर उमटवली.
या स्पर्धेसाठी आ. अनिकेत तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे थेट प्रक्षेपण यू ट्यूब चॅनेलवरून करण्यात आले होते. या मंडळाने सुसज्ज क्रीडांगणे तयार करून महिलांच्या प्रेक्षणीय सामन्यांचे आयोजनदेखील केले होते. महिला तसेच पुरुषांना स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. स्पर्धेतील विजयी संघास रोख रक्कम 15 हजार 1 रु व आकर्षक चषक, तर उपविजेता स्वयंभू हनुमान चिवे संघास रोख रक्कम 11 हजार 1 रु व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक कालभैरव आपटवणे संघास रोख रक्कम 7 हजार 1 रु व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक जय हनुमान रासळ या संघास रोख रक्कम 7 हजार 1 रु व आकर्षक चषक देऊन मंडळाच्या वतीने गौरविण्यात आले.
या स्पर्धेतील स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू यश सितापराव (झाप), उत्कृष्ट चढाईदार प्रणय तेलंगे (रासळ), उत्कृष्ट पक्कड शुभम दळवी (चिवे), पब्लिक हिरो सुमित मोरे (आपटवणे) या खेळाडूंना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.