नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा ऐरणीवर
| खोपोली | वार्ताहर |
विविध कारणांनी पाताळगंगेचे पाणी दिवसंदिवस प्रदूषित होत असल्याने या नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पाताळगंगा नदी रायगड जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे . खोपोलीतील उगमा पासून पुढे समुद्रापर्यंत या नदी काठावरील शेकडो गावे व येथील औद्योगिक क्षेत्रासाठी ही नदी भाग्यरेषा आहे. दिड लाखांच्या घरात लोकसंख्या असलेले खोपोली शहर पिण्याच्या पाण्यापासून ते दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी फक्त पाताळगंगा नदीवर अवलंबून आहे. दुसरीकडे दिवसेंदिवस या नदीचे प्रदूषण वाढत असल्याने नदीतील जलचर प्राणी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकण्याचे काम सुरूच आहे. अनेक वेळा नदीत पात्रात मोठ्या प्रमाणावर मासे मृत होण्याच्या घटना समोर येत असून , अचानक नदीतील पाण्याचा रंग बदलत असल्याचे ही समस्या समोर येत आहे.
पाताळगंगा नदीचे प्रदूषण वाढण्याची कारणे अनेक आहेत.यातील प्रमुख म्हणजे येथील औद्योगिक क्षेत्रातील अनेक कपन्यांतून छुप्या मार्गाने दररोज मोठया प्रमाणावर रसायन मिश्रीत सांडपाणी नदीत सोडत आहेत. खोपोली शहरातील हजारो लिटर सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न होता थेट नदीत सोडले जात आहे. अॅसिड व घातक रसायन वाहून नेणारे टँकर खुलेआम नदीकाढी उभी करून धुतली जात आहेत. तसेच मासे मारीसाठी केमिकल युक्त रसायन नदीच्या प्रवाहात टाकण्याचे प्रकारही वारंवार घडत आहेत.
एका बाजूला पाताळगंगा नदी प्रदूषित करण्यासाठी अनेक मार्गाने प्रयत्न केले जात असतांना, स्थानिक प्रशासन, प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी जबाबदार असलेले रायगड जिल्हा प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी मात्र एखादी घटना समोर आल्यावर नमुने तपासणी करून वेळ काढू धोरण अवलंबित आहेत.तपासलेल्या नमुन्याचे अहवाल काय, प्रदूषण करण्यात जबाबदार कोण व त्यानुसार योग्य कारवाई बाबत कोणतीच अधिकृत प्रक्रिया पूर्णत्वास जात नसल्याने पाताळगंगा नदीचे प्रदूषण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान खोपोली नगरपालिका सांडपाणी शुद्धीकरण योजना लालफितीत अडकल्याने शहरातील लाखो लिटर सांडपाणी दररोज नदी पात्रात कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात असल्याने, उगम स्थानाजवळच नदी प्रदूषित होत आहे.
नदी पत्रात मासे मृत्यू होण्याच्या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकार्यांना वेळोवेळी नमुने तपासणी व अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत. – आयुब तांबोळी, तहसीलदार खालापूर
खोपोलीतील निघणार्या सांडपाणी शुद्धीकरण योजनेला अंतिम मंजुरी प्राप्त झाली आहे. आवश्यक निधीही मंजूर करण्यात आला आहे. यात संपूर्ण शहरात भुयारी गटार योजना, सांडपाणी एकत्रीकरण , सिव्हेज ट्रिटमेंट प्लांट उभारून त्याद्वारे प्रक्रिया करून या पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे. – अनुप दुरे – पाटील, मुख्याधिकारी खोपोली