| मुंबई | प्रतिनिधी|
भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू, सलामीवीर सुधीर नाईक यांचे बुधवारी मुंबईत वयाच्या 78व्या वर्षी निधन झाले. दादर येथील आपल्या निवासस्थानी 25 मार्च रोजी स्नानगृहात पडल्यामुळे त्यांच्या मेंदूला इजा झाली होती. हिंदुजा इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारांना ते उत्तम प्रतिसादही देत होते. मात्र, अचानक त्यांना श्वसनाचा व उच्च रक्तदाबाचा त्रास झाला आणि त्यांची झुंज संपुष्टात आली. सुप्रसिद्ध साहित्यिका वसुंधरा पेंडसे-नाईक यांचे ते पती होते. त्यांच्या पश्चात, मुलगी राधिका, जावई आशुतोष देशपांडे आणि नात असा परिवार आहे.
सुधीर नाईक यांच्या पार्थिवावर गुरूवारी सकाळी दादर येथील वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी, त्यांचं पार्थिव दर्शनासाठी त्यांच्या दादर येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. सुधीर नाईक यांच्या क्रिकेट कारकिर्दीप्रमाणेच त्यांनी क्रिकेट मैदानाचे क्युरेटर म्हणूनही कारकीर्द गाजली. त्यांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचे क्युरेटर म्हणून जवळजवळ दोन दशके काम पाहिले. 1996 च्या व 2011च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांनी वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी सज्ज केली होती. क्रिकेटमधील एक उच्चशिक्षित क्रिकेटपटू अशी त्यांची ओळख होती. ते एमएस्सी होते, पीएचडी करीत होते. त्यांनी निवृत्तीनंतर नॅशनल क्रिकेट क्लब या मैदान क्लबच्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम क्रिकेटपटू घडविले. त्यामध्ये कसोटी खेळलेल्या झहीर खान, वासिम जाफर, निलेश कुलकर्णी आणि रणजीपटू सुनील मोरे, राजेश पवार, मनिष पटेल, अमित दाणी, अतुल रानडे आदींचा समावेश आहे.
सुधीर नाईक यांच्या नेतृत्त्वगुणाचेही कौतुक केले जायचे. 1974 साली त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटीत इंग्लंडमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणाच्या पहिल्याच डावात त्यांनी झुंजार 77 धावा केल्या होत्या.
मुंबईचे सर्व प्रमुख क्रिकेटपटू 1971 च्या सुमारास भारतीय संघातर्फे खेळण्यासाठी दौर्यावर गेले असताना त्यांनी नवोदित खेळाडूंना घेऊन मुंबईला रणजी विजेतेपद मिळवून देण्याचा पराक्रम केला होता. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वगुणाचेही त्यावेळी कौतुक झाले होते. रणजी क्रिकेटस्पर्धेत 85 सामन्यात त्यांनी 4376 धावा फटकाविल्या होत्या. त्यामध्ये बडोदे संघाविरुद्ध झळकाविलेल्या नाबाद द्विशतकाचाही समावेश होता. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारीणीवरही त्यांनी काम करून आपली छाप टाकली होती.