लंकेसह दोन वेळची चॅम्पियन इंडिज बाहेर
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक यंदा भारतात खेळविला जाणार आहे. आयसीसीने विश्वचषकाच्या पात्रतेसाठी काही नवीन नियमांचा समावेश केला होता. चार वर्षे चाललेल्या या आयसीसी विश्वचषकाच्या सुपर लीगद्वारे आठ संघ विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. दरम्यान, एकही सामना न खेळता दक्षिण आफ्रिकेचा संघ बुधवारी आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे.
आयसीसी विश्वचषकाच्या सुपर लीगद्वारे एकूण 8 संघांनी विश्वचषकात आपले स्थान पक्के केले आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिका आठव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 21 सामन्यांपैकी केवळ 9 सामने जिंकले आहेत. विश्वचषक स्पर्धेच्या थेट पात्रता शर्यतीतून त्यांना बाहेर फेकला जाण्याचा धोका होता. पण तो एकही सामना न खेळता पात्र ठरला आहे. खरं तर आयर्लंड आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. आयर्लंड संघाने बांगलादेशचा 3-0 असा पराभव केला असता तर ते विश्वचषकासाठी पात्र ठरले असते. मात्र, मालिकेतील पहिला सामना रद्द झाला आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने एकही सामना न खेळता विश्वचषकात आपले स्थान निश्चित केले. भारताशिवाय यंदाच्या विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या संघांमध्ये न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. या आठ संघांनी आता आपली जागा निश्चित केली आहे.