| अहमदाबाद | वृत्तसंस्था |
पंजाब किंग्सने कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2025 मध्ये ज्या पद्धतीने खेळ केला होता, ते पाहता या संघाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले गेले होते. कारण गतवर्षी अय्यरच्या नेतृत्वाखालीच कोलकाता नाईट रायडर्सने तिसरे जेतेपद पटकावले होते. परंतु, यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अंतिम सामन्यात 6 धावांनी बाजी मारली आणि पंजाब किंग्सचे आयपीएल जेतेपद जिंकण्याचे स्वप्न दुसऱ्यांदा अधुरे राहिले. मात्र, या अविश्वसनीय प्रवासानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने पुढील वर्षी जेतेपदाचे चषक उंचावण्यासाठी नक्कीच जोर लावू, अशा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, उपविजेत्या पंजाब किंग्सला 12.5 कोटी आणि ढाल देऊन गौरविण्यात आले आहे.
या निकालानंतर श्रेयस अय्यर म्हणाला की, आमचा येथपर्यंतचा प्रवास अविश्वसनीय होता. मी आमच्या सपोर्ट स्टाफपासून सर्वांचे आभार मानतो. मागील सामन्यात मुंबई इंडियन्सला ज्या प्रकारे आम्ही हरवले, ते पाहून 200 पेक्षा जास्त धावा येथे आव्हानात्मक होत्या. परंतु, आज 190 धावांचा पाठलाग करताना आम्ही कमी पडलो. कृणाल पांड्याच्या स्पेलने मॅच फिरवली. पुढच्या वर्षी चषक जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न करू. या प्रवासात आम्ही बऱ्याच सकारात्मक गोष्टी शिकलो. आमच्या संघात युवा खेळाडू होते आणि त्यांनी बऱ्याच अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या संघाला कडवी टक्कर दिली आहे, असेही तो म्हणाला.