| बंगळुरू | वृत्तसंस्था |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मिळवलेल्या आयपीएल विजेतेपदाला गालबोट लागलं आहे. या ऐतिहासिक विजेतेपद पटकवल्यानंतर आज संघाची व्हिक्टरी परेड काढण्यात येणार होती. या कार्यक्रमाच्या पूर्वी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत.
कर्नाटक राज्य क्रिकेट संघाने आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर त्यांच्या सन्मानार्थ एका समारंभाचे आयोजन केले होते. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बंगळुरुत अनेक चाहते चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटपटूंची एक झलक पाहण्यासाठी जमा झाले. हजारो लोकांच्या उपस्थितीमुळे गर्दी अचानक अनियंत्रित झाली आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी लाठीचार्जही केला. पण या गर्दीत अनेकांचा मृत्यू झाला. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळं मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.