दीपक, हुसामुद्दीन, निशांत चमकले
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताच्या तीन खेळाडूंनी जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये कांस्यपदक पटकाविले. दीपक भोरिया, मोहम्मद हुसामुद्दीन व निशांत देव यांनी तिसरा क्रमांक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.
भारतीय खेळाडूंच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकण्याच्या आशांवर पाणी फेरले गेले. भारतीय संघ पदकतालिकेत तीन पदकांसह चौथ्या स्थानावर राहिला. उझबेकीस्तानने 9 पदकांसह पहिले स्थान पटकावले. क्युबा व रशिया या देशांनी प्रत्येकी सहा पदकांवर मोहोर उमटवली. कझाकस्तानने 5 पदकांसह तिसरे स्थान मिळवले.
फ्रान्सच्या बिल्लाल बेन्नामा याने 51 किलो वजनी गटात दीपकवर 4-3 असा विजय मिळवत अंतिम फेरीत वाटचाल केली. दीपकला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. हुसामुद्दीन याने दुखापतीमुळे उपांत्य फेरीच्या लढतीत न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूला पुढे चाल देण्यात आली. हुसामुद्दीनला कांस्यपदक मिळाले. आशियाई विजेता कझाकस्तानचा अस्लानबेक शामबर्गेनोव याने 71 किलो वजनी गटात भारताच्या निशांतवर 5-2 असा विजय मिळवला. त्यामुळे निशांतला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.