| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2023-2024च्या हंगामाकरिता भारतीय क्रिकेट संघाचा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड संघ विविध सामन्यांसाठी भारताचा दौरा करणार आहेत. विश्वचषक स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलिया भारतात तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. भारतीय संघाच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमानुसार भारतीय पुरुष संघ एकंदर 16 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार असून, यात पाच कसोटी, 3 एकदिवसीय आणि 8 ट्वेन्टी-20 सामन्यांचा समावेश आहे. याची सुरुवात सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेने होईल. हे सामने मोहाली, इंदूर, राजकोट येथे होतील. यानंतर ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषक स्पर्धेत सहभागी होईल आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पाच ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. अफगाणिस्तान तीन ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या दौऱ्यावर येईल. पाठोपाठ इंग्लंड संघ पाच कसोटी सामन्यांसाठी भारतात दाखल होईल.
2023-24 हंगामातील कार्यक्रम
ऑस्ट्रेलिया तीन एकदिवसीय सामने : 22 सप्टेंबर (मोहाली), 24 सप्टेंबर (इंदूर), 27 सप्टेंबर (राजकोट) पाच ट्वेन्टी-20 सामने : 23 नोव्हेंबर (विशाखापट्टणम), 26 नोव्हेंबर (त्रिवेंद्रम), 28 नोव्हेंबर (गुवाहटी), 1 डिसेंबर (नागपूर), 3 डिसेंबर (हैदराबाद)
अफगाणिस्तान विरुद्ध तीन ट्वेन्टी 20 सामने :
11 जानेवारी 2024 (मोहाली), 14 जानेवारी 2024 (इंदूर), 17 जानेवारी 2024 (बंगळूरु)
इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका :पहिली कसोटी : 25 ते 29 जानेवारी 2024 (हैदराबाद),दुसरी कसोटी : 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी 2024 (विशाखापट्टणम),तिसरी कसोटी : 15 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी (राजकोट),चौथी कसोटी : 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2024 (रांची),पाचवी कसोटी : 7 मार्च ते 11 मार्च 2024 (धरमशाला)